अपंगांचा आत्मदहनाचा प्रयत्न फसला
By admin | Published: June 23, 2017 12:05 AM2017-06-23T00:05:26+5:302017-06-23T00:05:26+5:30
अपंगांच्या विविध मागण्यांसाठी सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या अपंग जनता दलाच्या दोघांना पोलिसांनी वेळीच अटक केली.
दोघांना अटक : विभागीय आयुक्त कार्यालयासमोरील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अपंगांच्या विविध मागण्यांसाठी सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या अपंग जनता दलाच्या दोघांना पोलिसांनी वेळीच अटक केली. हा प्रकार गुरूवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर घडली.
अटक केलेल्या अपंग जनता दलाच्या कार्यकर्त्यांमध्ये कांचन विलास कुकडे (२८, रा. शिरजगाव), सविता नरेश पेलेकर (३२, निंभा, भातकुली) यांचा समावेश आहे. विस्तृत माहितीनुसार, अपंग कल्याण व पुनर्वसनासाठी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या सन २०१६-१७ च्या वार्षिक बजेटमध्ये २२,००,००० लाखांची तरतूद केली होती. त्यासाठी ३१ मार्च २०१७ पूर्वी जिल्ह्यातील अपंगांकडून अर्ज मागविले होते.
थेट अपंगांच्या खात्यात निधी वळता केला जाणार असल्याने योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील ३५० अपंगांनी अर्ज केले होते.
गाडगेनगर ठाण्यात गुन्हा दाखल
अमरावती : मात्र, तीन महिने उलटूनही या अर्जांवर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. हा निधी खर्च करण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या विभागप्रमुखाला ‘कारणे दाखवा’नोटीस बजावून त्यांच्यावर कारवाई करावी, असे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. मात्र, तरीही जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकाऱ्यांवर यासंदर्भात कोणतीच कारवाई केली जात नसल्याचा आरोप अपंग जनता दलाने केला आहे. जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई न झाल्यास व अपंग कल्याण पुनर्वसन निधी अपंगांच्या खात्यात जमा न झाल्यास सामूहिक आत्मदहनाचा इशारा देण्यात आला होता.
त्यानुसार बुधवारी अपंग जनता दलाचे सुधाकर काळे, शेख अनिस व राजीक शाह यांच्या नेतृत्वात अनेक अपंग कार्यकर्ते गुरूवारी विभागीय आयुक्त कार्यालयात केरोसिनच्या बाटल्या घेऊन पोहोचले. त्यातील दोघांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच पोहोचून दोघांना अटक केली. त्यांच्याविरूद्ध पोलिसांनी भादंविच्या कलम ३०९ नुसार गुन्हे नोंदविले आहेत. तर शेख अनिस शेख अहमद, प्रमोद शेंडे, शेख बबलू शेख मोहम्मद, जाहीर खाँ जब्बार खाँ, कमलेश गुप्ता, राजेंद्र घाटोळ, ज्योती देवकर, लांडगे, रामप्रकाश मोहोड, दिगंबर कोहळे, रमेश हाटे, शारदा चव्हाण, सिद्धार्थ खंडारे, विजय चेडे, महादेव साऊरकर, मिना पाचारे, मोहिनी माटणी, प्रभाकर राऊत, वावरे, रविंद्र धामणकर, राजीक शहा, दिलबर शहा, मनोज सुंदरे, दिनेश पखाले, अशोक पाटील, मोहन टोमने अशा २८ जणांविरूद्ध मुंबई पोेलीस कायद्यानुसार कलम १३५, २८५ नुसार गुन्हा नोंदविला आहे. याप्रकारामुळे गुरूवारी विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात खळबळ उडाली होती.