कापसाच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2023 06:57 PM2023-06-06T18:57:13+5:302023-06-06T18:57:21+5:30
गुजरातच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कापसाची दरवाढ केले जात नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे.
विदर्भात दरवर्षी मोठ्या प्रमाणात शेतकरी कपाशीची लागवड करून कापसाचे उत्पन्न घेत असतो यंदाही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन केलं आहे. मात्र यावर्षी कापसाचे भाव कमी घसरल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
अमरावती जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या घरात शेकडो क्विंटल कापूस पडून असून योग्य दर नसल्याने शेतकरी कापूस विकत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र खरिपाची पेरणी करायची असल्याने शेतकऱ्याला कमी भावात कापूस विकावा लागत आहे या प्रश्नावर आज स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर कापूस फेकून शासनाचा निषेध व्यक्त केला.
गुजरातच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कापसाची दरवाढ केले जात नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात कापूस उत्पन्न होत असूनही विदेशातून कापसाच्या गाठी सरकार आयात करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला असून महाविकास आघाडी सरकारने 13000 रुपये क्विंटल कापसाला भाव दिला होता त्याचप्रमाणे याही सरकारने भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.