बनावट बियाणे, खतांची खुलेआम विक्री
By admin | Published: June 28, 2014 12:21 AM2014-06-28T00:21:59+5:302014-06-28T00:21:59+5:30
जिल्ह्यात बनावट बीटी बियाणे व रासायनिक खते सर्रास विकली जात असल्याच्या घटना दररोज उघडकीस येत आहेत.
अमरावती : जिल्ह्यात बनावट बीटी बियाणे व रासायनिक खते सर्रास विकली जात असल्याच्या घटना दररोज उघडकीस येत आहेत. विभागात १५ दिवसांत दोन कोटींची बनावट बियाणे व खते जप्ती व कारवाई करण्यात आली आहे. सोमवार तसेच मंगळवारी आसरा व मूर्तिजापूर (तरोडा) गावात बनावट रासायनिक खतांची १६३ बॅग पकडण्यात आल्या. तक्रारी झाल्याने कृषी विभागाने या कारवाई केल्या. मुळात कृषी विभाग याबाबत गाफील असून भरारी पथकाद्वारा कुठलीही धडाक्याची कारवाई होत नाही. त्यामुळे दररोज लाखो रूपयांनी शेतकऱ्यांची लूट होत आहे.
जिल्ह्यात खरिपाच्या सरासरी पेरणी क्षेत्रापैकी ८० टक्के क्षेत्र हे कपाशी व सोयाबीनचे आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी या दोन्ही पिकाच्या पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे. बियाण्यांच्या वाढत्या मागणीनुसार किमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात परराज्यातून चोरट्या मार्गाने मोठ्या प्रमाणावर बनावट रासायनिक खते व बियाणे आणण्यात येत आहे. जिल्हा सीमालगतच्या तालुक्यात याची सर्रास विक्री होत आहे. वरूड, मोर्शी, धामणगाव, तिवसा व भातकुली तालुक्यात बोगस बीटी बियाणे विक्री होत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. जागृत शेतकऱ्यांनी कृषी विभागाला अवगत केल्यामुळे या ठिकाणी कारवाया झाल्या. विशेष म्हणजे हा सर्व बनावट माल दुकानात न मिळता अन्य ठिकाणी सापडला आहे. दररोज लाखो रूपयांनी शेतकऱ्यांची फसवणूक होत असताना जिल्ह्याचे १५ भरारी पथक झोपी गेले आहे काय, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बनावट बियाणे व खत कंपन्यांचे एजंट खुलेआम फिरत आहेत. नामांकित कंपनीच्या नावावर सर्रास बनावट मालाची विक्री होत आहे. वेगवेगळे आमिष दाखविले जात आहेत. बियाण्यांची खोटी मार्केटिंग करण्यात येऊन शेतकऱ्यांची दिवसाढवळ्या फसवणूक होत आहे. गावाचे सजग पहारी म्हणून ओळखले जाणारे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक हे अनभिज्ञ आहेत. गावात बोगस कंपनीच्या एजंटद्वारे बनावट खते, बियाण्यांची विक्री होत आहे. हे संबंधित अधिकाऱ्यांना माहीत असू नये यावर शेतकऱ्यांचा विश्वास बसत नाही. शेतकरी कुठल्याही आमिषाला लवकर बळी पडतो. ग्रामपंचायतीच्या गोदामात १०० बॅगा बनावट कंपनीचे खत १५ दिवसांपासून ठेवले जाते. सचिव म्हणतात, ''मला याची कल्पना नाही'', मुळात जबाबदारी कोणाची? कृषी विभागदेखील डोळे बंद करून विश्वास ठेवतो, शासनाच्या या यंत्रणेनेच शेतकऱ्यांचा खेळखंडोबा केला आहे. (प्रतिनिधी)