राज्यातील ५१,२७३ रेशन दुकानांमधून दूधविक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 11:46 AM2018-04-11T11:46:44+5:302018-04-11T11:47:03+5:30
राज्यातील ५१ हजार २७३ रास्त भाव दुकानांमधून दूधविक्री केली जाणार आहे. रास्त भाव दुकानदारांचे उत्पन्न वाढावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्यातील ५१ हजार २७३ रास्त भाव दुकानांमधून दूधविक्री केली जाणार आहे. रास्त भाव दुकानदारांचे उत्पन्न वाढावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शासकीय दूध योजनेत उत्पादित होणारे दूध व दुग्धजन्य पदार्थ तसेच आरे ब्रँडचे दूध व दुग्धजन्य पदार्थ शिधावाटप दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
यापूर्वी १९ जानेवारी व ९ मार्च २०१८ रोजीच्या निर्णयान्वये महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित अर्थात महानंद या दुग्धशाळेचे दूध व दुग्धजन्य पदार्थ रास्त भाव दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवण्यास मान्यता देण्यात आली होती. त्याच धर्तीवर आरे आणि शासकीय दूध योजनेतून उत्पादित होणाऱ्या उत्पादनाचे वितरण तथा विक्री करण्यास मान्यता द्यावी, असा प्रस्ताव कृषी व पदूम विकास विभागाने अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाला दिला होता. त्याअनुषंगाने ५ एप्रिल रोजी हा निर्णय घेण्यात आला आहे.
म्हणून रास्तभाव दुकानाची निवड
राज्यात ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत ५१२७३ रास्त भाव दुकाने कार्यरत आहेत. त्यापैकी ५४२७ आदिवासी भागात व २८ फिरती दुकाने आहेत. या दुकानांशी तब्बल २.५६ कोटी शिधापत्रिकाधारक जोडले गेले आहेत. इतक्या मोठ्या संख्येने नागरिकांना जोडणारी ही सर्वाधिक व्यापक योजना आहे. गावखेड्यात रास्त भाव दुकाने असल्याने आणि दूध ही दैनंदिन गरजेची वस्तू असल्याने दुधाची मोठी विक्री होऊ शकते. त्यातून रास्त भाव दुकानदारांचे उत्पन्न वाढण्याची मोठी शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.