बेचो तुम्हारे जोरू का लहेंगा, देवो हमारा फगवा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 11:10 PM2019-03-23T23:10:29+5:302019-03-23T23:10:55+5:30
‘जांगडी, बेचो तुम्हारे जोरू का लहेंगा, देवो हमारा फगवा रे...’, ‘चकर मकर क्या देखो, फगवा दे मुझको...’ अशा पारंपरिक बोलांसह ढोल-बासरीच्या निनादात मेळघाटच्या आसमंतात फगवा गीतांचा जल्लोष आहे. शुक्रवारपासून मेळघाटातील अतिदुर्गम आदिवासी पाड्यांतील आदिवासी युवक-युवतींचे टोळके गीत गात फगव्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. पाच दिवस हा रंगपंचमीचा महोत्सव साजरा होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : ‘जांगडी, बेचो तुम्हारे जोरू का लहेंगा, देवो हमारा फगवा रे...’, ‘चकर मकर क्या देखो, फगवा दे मुझको...’ अशा पारंपरिक बोलांसह ढोल-बासरीच्या निनादात मेळघाटच्या आसमंतात फगवा गीतांचा जल्लोष आहे. शुक्रवारपासून मेळघाटातील अतिदुर्गम आदिवासी पाड्यांतील आदिवासी युवक-युवतींचे टोळके गीत गात फगव्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. पाच दिवस हा रंगपंचमीचा महोत्सव साजरा होणार आहे.
मेळघाटातील आदिवासी कोरकू आपला सर्वात मोठा होळी हा सण संपूर्ण आठवडाभर साजरा करणार आहेत. प्राचीन परंपरांचे पूजक असलेल्या या आदिवासींचे आपले वेगळे विश्व आहे. होळी या सणासाठी स्थलांतरित झालेले बांधव तीन दिवसांपूर्वीच मेळघाटात परतलेत. गुरुवारी मोठी होळी पेटवल्यानंतर शुक्रवारपासून सुरू झालेल्या फगव्याचा जल्लोष सातपुडा पर्वतरांगांत घुमत आहे. पारंपरिक वेशभूषेत आदिवासी ढोल-बासरीच्या तालावर नाच-गाणे करीत आनंद साजरा करीत आहेत.
जांगळीला अडवून फगवा वसुली
मेळघाटातील आदिवासी हा शहरी माणसाला जांगळी म्हणतात. शुक्रवारपासून सुरू झालेल्या फगवा मागण्याच्या पद्धतीत गावातील बाजार किंवा मुख्य मार्गावर मानवी साखळी तयार करून शहरी जांगळीजवळून फगवा मागितला जातो. पाच दिवस फगवा मागितल्यानंतर जमा झालेल्या रकमेतून गावशिवारावर बकऱ्याचे जेवण व सिड्डूचे सेवन होणार आहे. रस्त्यावर दगड-धोंडे, मोठी लाकडे लावून, प्रत्येक वाहन अडवून त्यांच्याकडून आनंदाने हा फगवा मागितला जात आहे.