जुन्याच डब्यातून खाद्यतेलाची विक्री
By admin | Published: November 22, 2015 12:12 AM2015-11-22T00:12:44+5:302015-11-22T00:12:44+5:30
अमरावतीत खाद्यतेलाची रिफायनरी केल्यानंतर खाद्यतेल डब्यात भरले जाते. परंतु हे डबे जुनेच वापरण्यात येत असल्यामुळे व त्याला कधीकधी जंग लागते.
आरोग्याला धोका : अन्न, प्रशासन विभागाचे दुर्लक्ष
संदीप मानकर अमरावती
अमरावतीत खाद्यतेलाची रिफायनरी केल्यानंतर खाद्यतेल डब्यात भरले जाते. परंतु हे डबे जुनेच वापरण्यात येत असल्यामुळे व त्याला कधीकधी जंग लागते. ते आरोग्याला धोकादायक असून असे खाद्यतेल अमरावतीमध्ये विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे. पण, याकडे अन्न व प्रशासन विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
सोयाबीन व सरकी यापासून निघणाऱ्या खाद्यतेलासाठी रिफायनरी आवश्यक असते. अमरावतीत तीन ठिकाणी खाद्यतेलावर रिफानिंग करणारे प्लांट असल्याची माहिती आहे. नंतर त्या तेलाची रिपॅकींग करण्यात येते. रिपॅकींग करणारे अनेक केंद्र अमरावतीत आहेत. अन्न व सुरक्षा मानके कायदा २००६ अंतर्गत जुन्या टिनाचा पत्रा असलेल्या डब्यात खाद्यतेलाची विक्री करणाऱ्यास बंदी आहे. नियमाने प्रत्येकवेळी नवीन डब्यांचा वापर करणे बंधनकारक असताना जुन्याच डब्यांचा वापर काही ठिकाणी करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. अन्न व प्रशासन विभागाने धाडी टाकून अशा केंद्रांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. पण वर्षभरात फक्त एका ठिकाणी कारवाई झाल्याचे अन्न व सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कोट्यवधी रूपयांची खाद्यतेलाची विक्री
नागरिकांच्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तू असलेल्या खाद्यतेलाची अंबानगरीत कोट्यवधी रुपयांची विक्री होते. जंग लागलेल्या डब्यात खाद्यतेल भरत असतील तर ते आरोग्याला हानीकारक आहे. हा नागरिकांच्या जीवनाशी खेळ असून अन्न व प्रशासन विभागाने नमुने घेऊन कारवाई करणे गरजेचे आहे.