सेमाडोह ते हतरू मार्ग नादुरुस्त, ३० गावांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 06:00 AM2020-02-22T06:00:00+5:302020-02-22T06:00:50+5:30
पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत कामे सुरू करण्यासाठी जून २०१९ पासून हा रस्ता बंद करण्यात आला होता. सदर रस्त्याचे काम फेब्रुवारी २०२० पर्यंतही पूर्ण झाले नाही. दुसरीकडे पंतप्रधान ग्राम सडक योजना विभागाने सदर मार्गावर बस फेरी सुरू करण्याचे पत्र परतवाडा आगाराला दिले होते. त्यावर १९ फेब्रुवारी रोजी वाहतूक निरीक्षक नीलेश मोकलकर यांनी सदर रस्त्याचे एसटी बस नेऊन निरीक्षण केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : मेळघाटातील अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या तालुक्यातील सेमाडोह ते हतरू या ४६ किलोमीटर अंतरात ३० किलोमीटरपेक्षा अधिकचा रस्ता नादुरुस्त, खड्डेमय असल्याने यावर प्रवासी बसफेरी चालविणे शक्य नसल्याचा अहवाल परतवाडा आगारातर्फे देण्यात आला.
त्यामुळे नऊ महिन्यांच्या ‘बे्रक’नंतरही या मार्गावर बसफेरी होणार नसल्याचे स्पष्ट झाले. या मार्गातील बसफेरी बंद झाल्याने आजूबाजूच्या ३० गावांतील हजारो नागरिकांना पायपीट करावी लागणार आहे.
पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत कामे सुरू करण्यासाठी जून २०१९ पासून हा रस्ता बंद करण्यात आला होता. सदर रस्त्याचे काम फेब्रुवारी २०२० पर्यंतही पूर्ण झाले नाही. दुसरीकडे पंतप्रधान ग्राम सडक योजना विभागाने सदर मार्गावर बस फेरी सुरू करण्याचे पत्र परतवाडा आगाराला दिले होते. त्यावर १९ फेब्रुवारी रोजी वाहतूक निरीक्षक नीलेश मोकलकर यांनी सदर रस्त्याचे एसटी बस नेऊन निरीक्षण केले. त्यामध्ये या मार्गाचे केवळ सहा किलोमीटरपर्यंत सिमेंटीकरण करण्यात आले; उर्वरित मार्ग खडतर आणि खड्डेमय असल्याचा अहवाल वरिष्ठांना दिला आहे. त्यामुळे सदर मार्गावर प्रवासी बसफेरी चालविणे धोकादायक असल्याचा अहवाल त्यांनी दिला. सेमाडोह ते हतरू हा मार्ग परिसरातील जवळपास ३० पेक्षा अधिक आदिवासी खेड्यांना तालुका व जिल्हा मुख्यालयी जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे नऊ महिन्यांपासून हा मार्ग बंद असल्यामुळे या ३० गावातील नागरिकांना पायदळ किंवा कारंजखेडा, जारीदा, चुनखडी अशा लांब पल्ल्याच्या रस्त्याने ये-जा करावी लागत आहे.
सेमाडोह ते हतरू रस्त्याचे निरीक्षण करण्यात आले. सदर मार्गावर खड्डे असल्याने व संपूर्ण मार्गच नादुरुस्त असल्याने प्रवासी वाहतूक करणे धोकादायक आहे. त्यामुळे मार्गावर एसटी बस धावणे, पाठविणे शक्य नाही.
- नीलेश मोकळकर, वाहतूक निरीक्षक, परतवाडा आगार