नियोजित वराला पाठविले प्रेयसीचे सेमी न्युड फोटो; तरूणीचे लग्न मोडले
By प्रदीप भाकरे | Published: April 25, 2023 01:43 PM2023-04-25T13:43:16+5:302023-04-25T13:45:03+5:30
प्रियकराकडून बदनामी, गुन्हा दाखल
अमरावती : प्रेयसीचे अर्धनग्न फोटो तिच्या नियोजित वराला पाठवून प्रियकराने तिचे जुळलेले लग्न मोडले. हा धक्कादायक प्रकार माहुली जहांगिर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २२ एप्रिल रोजी उघड झाला. याप्रकरणी पोलिसांनी पिडिताचा पुर्वप्रियकर विजय रवी मोहिते (२४, रा. वाघोली) याच्याविरूध्द २४ एप्रिल रोजी विनयभंग, सामाजिक बदनामी व आयटी ॲक्टअन्वये गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, २४ वर्षीय पिडित तरूणीचे आरोपीसोबत दोन वर्षापुर्वीपासून मैत्री व प्रेमसंबंध होते. दोघांनी प्रेमाच्या आणाभाका देखील घेतल्या. प्रेमसंबंध अधिक घट्ट झाल्याने पिडीत फिर्यादी ही आरोपीलामोबाईल फोनवर कॉल व व्हिडीओ कॉल करायची. दोघांमध्ये आत्मिय संवाद होता. दरम्यानच्या काळात आरोपीने तिचे खाजगी अर्धनग्न फोटोचे स्क्रीन शॉट काढून ठेवले. तथा ते मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवले. काही काळानंतर त्यांचे प्रेमसंबंध संपुष्टात आले.
दरम्यान, अलिकडे फिर्यादी तरूणीचे दुसऱ्या एका तरुणासोबत लग्न जुळले. ती बाब आरोपी विजय याला माहित होताच त्याने तिचा पिच्छा पुरविला. वारंवार कॉल करुन तू माझ्याशी लग्न कर, असे म्हणून पिडीताचा लैंगिक छळ केला. त्यामुळे ती प्रचंड हादरली. तिने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र तो समजण्यास तयार नव्हता.
म्हणून मोडले लग्न
आरोपी विजय मोहिते हा तेवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने मोबाईलमध्ये संकलित करून ठेवलेले पिडीताचे अर्धनग्न फोटो व तिने त्याच्याशी पुर्वी व्हॉटसअपवर केलेले चॅटिंग तिच्या भावी पतीला पाठविले. त्यामुळे तिची प्रचंड सामाजिक बदनामी झाली. ते अर्धनग्न फोटो व चॅटिंग पाहून नियोजित वराने तिच्यासोबतचे लग्न मोडले. त्यामुळे तरूणीच्या पायाखालची वाळू सरकली. त्यामुळे मनाचा हिय्या करत तिने २४ एप्रिल रोजी सायंकाळी माहुली पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी रात्री ११.४० च्या सुमारास तिच्या तक्रारीवरून विजय मोहितेविरूध्द गुन्हा नोंदविला.
संबंधित पिडिताच्या तक्रारीवरून आरोपीविरूध्द विनयभंग, बदनामी व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदविला. अटक व्हायची आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे.
- मिलिंद सरकटे, ठाणेदार, माहुली