सिनेट निवडणूक : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात रात्री उशीरापर्यंत मतमोजणी संथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2022 01:19 PM2022-11-23T13:19:35+5:302022-11-23T13:19:50+5:30
यासोबत विद्या परिषदेच्या सहा जागांसाठी तर अभ्यास मंडळाच्या विद्याशाखानिहाय प्रत्येकी तीन विभागप्रमुखांसाठी ही मतमोजणी प्रक्रिया सुरू
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) साठी रविवारी मतदार पार पडल्यानंतर मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात झाली. परंतु रात्री उशिरापर्यंत मतदान छाननी प्रक्रियाच सुरू होती. दरम्यान, बुधवारी पहाटेपर्यंत निकालाचा कल स्पष्ट होण्याची शक्यता आहे. विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र विभागाच्या सभागृहामध्ये तसेच ज्ञानस्रोत केंद्रातील अभ्यासिकेमध्ये मतमोजणी होत आहे.
मतमोजणी प्रक्रिया ही आठ टेबलवरसुरू आहे. सायंकाळी आठ वाजेपर्यंत गठ्ठे लावण्यात येत होते. यानंतर विद्याशाखा, पदवीधर, शिक्षक, आदी मतदारसंघनिहाय मोजणीसाठी मतपत्रिका ठेवण्यात आल्या. मतदान केंद्रावर नुटा, शिक्षण मंच, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व जस्टिस पॅनलचे उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. उशिरा रात्रीपर्यंत निकाल येणार असल्याने विद्यापीठात मंगळवारी दिवसभर निकालाची चर्चा सुरू होती.
एकूण ३९ अधिसभा सदस्यांपैकी ३६ सदस्यांसाठी ही निवडणूक झाली. यात प्राचार्य संवर्गातून दहा व्यवस्थापन परिषद सहा, दहा महाविद्यालयीन शिक्षक, तीन विद्यापीठ शिक्षक, दहा नोंदणीकृत पदवीधर मतदार संघासाठी निवडणुकीत लढत होत आहे. यासोबत विद्या परिषदेच्या सहा जागांसाठी तर अभ्यास मंडळाच्या विद्याशाखानिहाय प्रत्येकी तीन विभागप्रमुखांसाठी ही मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे. कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे, प्र-कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे व कुलसचिव तथा निर्वाचन अधिकारी डॉ. तुषार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया सुरू आहे.
विजयी उमेदवार
- तीन विद्यापीठ शिक्षक संवर्गात सामान्य वर्गवारीत डॉ. संदीप वाघुले यांना ३३ तर डॉ. अनिल नाईक यांना २४मते प्राप्त झाली. डॉ. संदीप वाघुले यांची अधिसभेवर निवड झाली. महिला वर्गवारीत डॉ. जागृती बारब्दे विजयी झाले. जागृती बारब्दे यांना ३५ मते तर डॉ. वैशाली धनविजय यांना २२ मते मिळाली.
- विद्यापीठ सिनेट निवडणुकीत दहा प्राचार्य संवर्गामध्ये एससी वर्गवारीत प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांना ६५तर डॉक्टर राजेंद्र रामटेके यांना४९ मते मिळाली. प्राचार्य डॉक्टर सुभाष गवई विजयी झाले आहेत.
- डी.टी. एन. टी. वर्गवारीत प्राचार्य डॉक्टर राजेश चंदनपाट यांना४० तर विजय नागरे यांना ७४ मते मिळाली. डॉ. विजय नागरे विजयी झाले आहेत.
- ओबीसी वर्गवारीत प्राचार्य डॉक्टर उद्धव जाणे यांना४३ तर प्राचार्य डॉक्टर अंबादास कुलट यांना ७३ मते मिळाली असून प्राचार्य डॉक्टर अंबादास कुलट विजयी झाले.
- महिला वर्गवारी प्राचार्य डॉक्टर मीनल ठाकरे यांना ५१ तर प्राचार्य डॉक्टर अनुराधा वैद्य यांना ६४ मते मिळाली. प्राचार्य डॉक्टर अनुराधा वैद्य विजयी झाले आहेत