सिनेट सद्स्याच्या ईतिवृत्त दुरुस्तीचे पत्र झाले गहाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:13 AM2021-03-06T04:13:00+5:302021-03-06T04:13:00+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात २९ डिसेंबर २०२० रोजी झालेल्या सिनेट सभेच्या ईतिवृत्तात दुरुस्तीसाठी पाठविलेले पत्र गहाळ करण्यात ...
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात २९ डिसेंबर २०२० रोजी झालेल्या सिनेट सभेच्या ईतिवृत्तात दुरुस्तीसाठी पाठविलेले पत्र गहाळ करण्यात आले आहे. याबाबत राज्यपाल नामित सिनेट सदस्य मनीष गवई यांनी तक्रार नोंदविली असून, यातील दोषींवर कठोर शासन व्हावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कुलगुरू मुरलीधर चांदेकर, कुलसचिव तुषार देशमुख यांना पाठविलेल्या तक्रारीनुसार, मनीष गवई यांनी विद्यापीठात २७ जानेवारी रोजी पत्र पाठवून २९ डिसेंबर २०२० रोजी झालेल्या सिनेट सभेच्या ईतिवृत्तात दुरुस्तीबाबत कळविले होते. सिनेट सभेत विद्यार्थी प्रश्नावर विद्यापीठाचे लक्ष वेधण्यात आले. एखाद्या सिनेट सदस्यांने ईतिवृत्तात काही महत्वाच्या दुरुस्ती सूचविल्या असतील, तर त्या होणे अनिवार्य आहे. मात्र, राज्यपाल नामित सिनेट सदस्यांच्या सूचनांना काहीही महत्त्व दिले जात नाही, असा आक्षेप मनीष गवई यांनी घेतला. पोस्टाने पाठविलेले पत्र गहाळ झाले कसे? पोस्टाची पोहच पावती आहे. सिनेट सदस्य म्हणून मी काही गैरजबाबदारीने वर्तन केले असल्यास माझ्यावरही कारवाई करावी, अशी मागणी पत्राद्धारे केली आहे. विद्यार्थी हिताचे प्रश्न, समस्या मांडायच्या नाही का, असेही गवई यांनी म्हटले आहे. याप्रकरणी कुलसचिव तुषार देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाही, हे विशेष.
-------------