प्रत्येक जिल्ह्यात केंद्रीय पथक पाठवा, खासदार नवनीत राणा यांची नरेंद्र मोदींकडे विनंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 07:31 PM2020-04-26T19:31:40+5:302020-04-26T22:04:59+5:30
राज्यातील बहुतेक जिल्ह्यांत कोरोना संकटामुळे स्थिती बिकट आहे. याचे वास्तव चित्र समोर येण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात केंद्रीय पथक पाठविण्याची विनंती खासदार नवनीत राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.
अमरावती : राज्यातील बहुतेक जिल्ह्यांत कोरोना संकटामुळे स्थिती बिकट आहे. याचे वास्तव चित्र समोर येण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात केंद्रीय पथक पाठविण्याची विनंती खासदार नवनीत राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. शनिवारी रात्री सव्वादहा वाजता पंतप्रधान यांनी खासदारांना फोन करून कोरोना संबंधित जिल्ह्याची माहिती जाणून घेतली. यावेळी राणा यांच्या मागणीवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.
शासनाने डॉक्टर, नर्स आदींना ५० लाखांचा सुरक्षा विमा दिला, त्याच धर्तीवर पोलीस, सफाई कर्मचारी, माध्यम प्रतिनिधी यांनाही सुरक्षा विम्याचा लाभ द्यावा, तसेच लॉकडाऊनमुळे देशाच्या विविध राज्यांतील नागरिक विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यांना ये-जा करण्यासाठी परवानगी द्यावी आदी मागण्या खासदार राणा यांनी पंतप्रधानांकडे केल्या. अमरावती जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढती आहे. जिल्हा आता आॅरेंज झोनमधून रेड झोनमध्ये परावर्तीत होण्याच्या स्थितीत असल्याविषयीची माहिती खासदारांनी दिली.
राणा परिवाराद्वारा गोरगरिबांना अन्नधान्य वाटप करण्यात येत असल्याबाबत माहिती त्यांनी दिली असता, या उपक्रमाचे पंतप्रधानांनी स्वागत केले. तसेच सोशल डिस्टन्सिंग राखून हा उपक्रम सुरू ठेवावा, असा सल्ला राणा यांना दिला. कोरोनाच्या संकटावर लॉकडाऊन व सामाजिक अंतर हाच उपाय असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. नवनीत राणा यांनी पंतप्रधानांना केलेल्या ट्विटची आठवण करून दिली असता, सदर ट्विट वाचल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास फोन केला. कोरोनासंबंधी राज्यातील काही माहिती त्यांनी जाणून घेतली. पंतप्रधानांच्या फोनमुळे उत्साह द्विगुणित झाला.
- नवनीत राणा,
खासदार, अमरावती