वरिष्ठ अधिकारी रात्रकालीन गस्तीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 11:14 PM2017-10-31T23:14:02+5:302017-10-31T23:14:42+5:30
घरफोडीच्या घटनांमुळे धास्तावलेल्या अमरावतीकरांच्या सुरक्षिततेसाठी तीन दिवसांपूर्वीपासून वरिष्ठ पोलीस अधिकारी रात्रकालीन गस्तीवर आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : घरफोडीच्या घटनांमुळे धास्तावलेल्या अमरावतीकरांच्या सुरक्षिततेसाठी तीन दिवसांपूर्वीपासून वरिष्ठ पोलीस अधिकारी रात्रकालीन गस्तीवर आहेत. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी सोमवारी रात्री घडलेल्या गुन्ह्यातील घटनास्थळी भेट घेऊन तथ्य जाणून घेतले आहे. शहरातील ८० टक्के पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरली असून आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे.
चोर आल्याच्या अफवेने अवघे अमरावतीकर भयभीत झाले असून राठीनगरातील घटनांमुळे पोलीसांचीही ताराबंळ उडाली आहे. तीन दिवसांपासून तीनही पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, सर्व ठाण्याचे पोलीस निरीक्षक व बहुंताश पोलीस कर्मचाºयांना नाईट गस्तीवर राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. सीपींनी राठीनगरातील घटनास्थळाची पाहणी करून कॅम्प पॉइन्ट कार्नरवर झालेल्या गोळीबारीच्या घटनेचा आढावा घेतला. तेथील रहिवासी अनीकेत देशमुख यांच्यासह परिसरातील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.
बंदुकधारी पोलीस तैनात
मध्यरात्रीनंतर शहरातील विविध परिसरांत बंदुकधारी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. बहुतांश पोलीस शहराच्या शेवटच्या भागात गस्त घालून संशयितांवर नजर ठेवून आहेत. जंगल किंवा शेतातून शहरात दाखल होणाºया चोरांवर पोलीस नजर ठेवून आहेत.
पोलिसांची शेकडो पथके सज्ज
चोरीच्या घटनांची चौकशी व नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने सीपींनी सर्व ठाण्यातील बहुतांश पोलीस कर्मचाºयांची विविध पथके नेमली आहेत. कार्यालयीन कामकाजावरील पोलिसांनाही रात्रकालीन गस्तीचे काम दिले आहे. यासाठी पाच वाहने व दुचाकीही उपलब्ध केल्या आहेत.