वन विभागात वरिष्ठांना ५ वर्षांतच बढती? वनरक्षकांना १५ वर्षांची प्रतीक्षा, सहायक वनसंरक्षकांची निवड सूची तयार
By गणेश वासनिक | Published: May 16, 2023 01:38 PM2023-05-16T13:38:54+5:302023-05-16T13:40:16+5:30
वन विभागात प्रादेशिक, वन्यजीव, सामाजिक वनीकरण, कार्यआयोजना, रोहयो असे उपविभाग तयार करण्यात आल्यानंतर वन कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणतेच ठोस धोरण आखले नाही.
अमरावती : राज्याच्या वन विभागात सहायक वनसंरक्षक ते अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक या पदांना ५ ते ६ वर्षांतच पदोन्नती दिली जाते. मात्र, वनरक्षक ते वनपरिक्षेत्राधिकारी यांना पदोन्नतीकरिता १५ वर्षांची प्रतीक्षा करावी लागते. वन विभागात कनिष्ठांना पदोन्नती देताना विषमता दिसून येते.
वन विभागात प्रादेशिक, वन्यजीव, सामाजिक वनीकरण, कार्यआयोजना, रोहयो असे उपविभाग तयार करण्यात आल्यानंतर वन कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणतेच ठोस धोरण आखले नाही. महाराष्ट्रात वनरक्षक ते वनपरिक्षेत्राधिकांऱ्यांच्या पदोन्नतीत केवळ एकच वनपाल पद आहे. तर मध्य प्रदेशात वनपाल ते वनपरिक्षेत्राधिकाऱ्यास सहायक वन क्षेत्रपाल पद निर्माण करण्यात आले आहे.
आयएफएस लॉबीने फायद्यासाठी केली पदनिर्मिती
राज्याच्या वन विभागात आजमितीला वनरक्षक ९०००, वनपाल २८०० तर वनपरिक्षेत्राधिकारी ९९५ एवढीच पदे आहेत. मात्र, वरिष्ठ स्तरावर आता सात प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि २१ अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, ४० मुख्य वनसंरक्षक, ११० उपवनसंक्षकांची फौज आहे. दरम्यानच्या काळात अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि प्रधान मुख्य वनसंरक्षकाची पदे दुप्पट वाढविण्यात आली आहेत.
वन कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत दुय्यम स्थान
किमान १० वर्षांत वन कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याचे शासन धोरण असताना याचे पालन वन विभागात होत नाही. वास्तविक पाहता सर्वात खालचा पाया असलेल्या वनरक्षक, वनपालांना पदोन्नतीचा लाभ ८ वर्षांत मिळावा. मात्र, असे होताना दिसून येत नाही. आरएफओ हे पद राजपत्रित असतानासुद्धा त्यांची पदे वाढविण्यात आली नाहीत. परिक्षेत्राचे विभाजन केले नाही.
सहायक वनसंरक्षकांना ५ वर्षात बढती
सहायक वनसंरक्षक गटातून विभागीय वनाधिकारी संवर्गात पदोन्नती देण्यासाठी कार्मिक विभागाने १०७ एसीएफ यांची यादी प्रकाशित केली आहे. यातील ८५ एसीएफ यांना बढती मिळणार आहे. या यादीत ज्या सहायक वनसंरक्षकांना प्रशिक्षण वगळून सेवेत ५ ते ६ वर्षे झाल्यानंतर पदोन्नती मिळणार आहे. यातील बहुतांश एसीएफ यांनी पदोन्नतीनंतर फिल्डिंग लावल्याची माहिती आहे.