मध्यरेल्वेच्या महाप्रबंधकांनी जाणून घेतल्या व्यथा
By admin | Published: January 15, 2015 10:43 PM2015-01-15T22:43:05+5:302015-01-15T22:43:05+5:30
मध्य रेल्वेचे महाप्रबंधक एस. के. सूद यांनी बडनेरा रेल्वेस्थानकाची पाहणी केली. ते गुरूवारी ‘स्पेशल ट्रेन’नी आले होते. त्यांचा हा पाहणी दौरा होता. दरम्यान रेल्वे संबंधातील विविध समस्यांचे निवेदन
बडनेरा : मध्य रेल्वेचे महाप्रबंधक एस. के. सूद यांनी बडनेरा रेल्वेस्थानकाची पाहणी केली. ते गुरूवारी ‘स्पेशल ट्रेन’नी आले होते. त्यांचा हा पाहणी दौरा होता. दरम्यान रेल्वे संबंधातील विविध समस्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले.
सकाळी ८ वाजता मध्य रेल्वेचे महाप्रबंधक एस. के. सूद हे रेल्वेच्या विविध विभागाशी संबंधित १३५ अधिकाऱ्यांसह आले होते. १६ डब्याच्या स्पेशल ट्रेनमधून हे अधिकारी आले होते.
लोकप्रतिनिधींनी मांडल्या व्यथा
एस. के. सूद यांचे स्टेशन मास्तर एम. के. पिल्ले यांनी स्वागत केले. त्यानंतर त्यांनी एक तासपर्यंत बडनेरा रेल्वे स्थानकाची पाहणी केली. रेल्वेस्थानकावरील लॉबी रुमची पाहणी केली. शौचालय, पाण्याचे स्टॅन्ड तपासले. खास करुन स्वच्छतेवर त्यांचा अधिक भर होता. पुढे ज्या ठिकाणी रेल्वेचे चालक मुक्कामी असतात त्या रनिंग रूमची पाहणी केली. त्याठिकाणी जेवण कसे मिळते याची विचारणा चालकाला केली. विश्रामासाठी असणाऱ्या प्रत्येक बाबीची सखोल चौकशी केली. काही बाबतीत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देखिल केल्यात. दरम्यान त्यांच्यासोबत सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी, लोको आॅपरेटींग मॅनेजर अरविंदकुमार, चिफ कमर्शिअल मॅनेजर आर. डी. शर्मा, भुसावळ मध्य रेल्वेचे प्रबंधक महेश गुप्ता, रेल्वे सुरक्षा बलाचे प्रमुख उदय शुक्ला हे प्रमुख अधिकारी होते. दरम्यान बडनेरा रेल्वेस्थानकाशी संबंधित व प्रवाश्यांच्या हिताचे विविध कामांचे निवेदन आमदार रवी राणा, रेल्वे बोर्डाचे सदस्य सुनील भालेराव यांनी दिले. यावेळी नगरसेवक विजय नागपुरे, अजय जयस्वाल, संजय बोबडे, सुकलाल कैथवास, महेश येते यांच्यासह इतरही निवेदनकर्ते उपस्थित होते.
दरम्यान रेल्वेचे महाप्रबंधक एस. के. सूद यांनी प्राप्त झालेल्या निवेदनासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन उपस्थित लोकप्रतिनिधी व नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना यावेळी दिले. महाप्रबंधकांचा दौरा असल्यामुळे कधी नव्हे एवढे बडनेरा रेल्वेस्थानक स्वच्छतेने चकाकाल्याचे दिसून आले. मात्र अशाच प्रकारची स्वच्छता रेल्वेस्थानकावर ठेवावी अशी चर्चा महाप्रबंधकांच्या दौऱ्यात प्रवासी व नागरिकांमधून व्यक्त होत होती. (शहर प्रतिनिधी)