कामगार नोंदणी तालुक्यातही अन् शहरातील वाॅर्डाला स्वतंत्र दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:10 AM2021-06-23T04:10:11+5:302021-06-23T04:10:11+5:30
अमरावती : जिल्हा कामगार कार्यालयात नोंदणी व नूतनीकरणासाठी सध्या कामगारांची तोबा गर्दी उसळली आहे. याबाबत ‘लोकमत’ने छायाचित्राद्वारे प्रशासनाचा लक्षवेध ...
अमरावती : जिल्हा कामगार कार्यालयात नोंदणी व नूतनीकरणासाठी सध्या कामगारांची तोबा गर्दी उसळली आहे. याबाबत ‘लोकमत’ने छायाचित्राद्वारे प्रशासनाचा लक्षवेध केला. या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ग्रामिणची नोंदणी तालुक्याला व अमरावती शहरातील कामगार नोंदनी वाॅर्डनिहाय करण्याचे आदेश कामगार विभागाला दिले.
जिल्ह्यात आतापर्यंत ५०,१४० कामगारांची नोंदणी व १०,२१७ कामगारांनी नूतनीकरण केले आहे. सध्यादेखील ही प्रक्रिया सुरूच आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात येत असल्याचे सरकारी कामगार अधिकार अधिकारी राहुल काळे यांनी सांगितले.
वाढत्या कोरोना संसर्गाचे पार्श्वभूमीवर जिल्ह्यासह राज्यात लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर बांधकाम कामगार व मंडळ अंतर्गत नोंदणी केलेल्या घरेलू कामगारांनाही प्रत्येकी १,५०० रुपयांच्या मदतीची घोषणा शासनाने केली होती. त्यापूर्वीदेखील कामगारांची नोंदणी सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात या कार्यालयात कामगारांच्या रांगा लागल्या होत्या. आता प्रत्यक्ष कामगारांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्याने नूतनीकरणासाठी मोठी गर्दी उसळलेली आहे.
कोरोनाकाळात वाढती गर्दी व कामगारांच्या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी लक्षणे असलेल्या कामगारामच्या जागीच रॅपिड अँटिजेन चाचण्या करण्यात येत आहेत. याशिवाय कामगार न्यायालयालगत असलेल्या कार्यालयात आता नोंदणीची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती राहुल काळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
पाईंटर
कामगार नोंदणी : ५२,१४०
सध्या नूतनीकरण : १०,२१७
घरेलू कामगार नोंदणी : ५१७
शासनाद्वारा मिळालेली मदत : प्रत्येकी १,५००
बॉक्स
९० दिवसांचे प्रमाणपत्र आवश्यक
बांधकाम कामगाराच्या नोंदणीसाठी त्याने किमान ९० दिवस काम केले असले पाहिजे. यासाठी संबंधित कंत्राटदार, ग्रामसेवक किंवा महापालिकेने प्राधिकृत केलेले अधिकारी यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यानंतर बांधकाम कामगाराची नोंदणी होते व दरवर्षी नूतनीकरण करावे लागते. नोंदणी केलेल्या कामगारास आवश्यक साधने असलेली पेटी दिली जात असल्याची माहिती कामगार कार्यालयाने दिली.
कोट
बांधकाम कामगाराची नोंदणी व नूतनीकरणासाठी मोठी गर्दी असल्याने त्या विभागाला महापालिकेच्या वाॅर्डनिहाय नोंदणी करण्याच्या, तालुक्याला नोंदणी करण्याच्या व कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत.
- नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी