म्युकरमायकोसिसवरील उपचारासाठी स्वतंत्र वाॅर्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:12 AM2021-05-15T04:12:30+5:302021-05-15T04:12:30+5:30

अमरावती : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुले बाधित होण्याची शक्यता गृहीत धरून लहान मुलांसाठी तसेच म्युकरमायकोसिसवरील उपचारासाठी स्वतंत्र ...

Separate ward for treatment of mucomycosis | म्युकरमायकोसिसवरील उपचारासाठी स्वतंत्र वाॅर्ड

म्युकरमायकोसिसवरील उपचारासाठी स्वतंत्र वाॅर्ड

Next

अमरावती : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुले बाधित होण्याची शक्यता गृहीत धरून लहान मुलांसाठी तसेच म्युकरमायकोसिसवरील उपचारासाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शुक्रवारी येथे दिले.

जिल्ह्यातील कोरोना उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी बालरोगतज्ज्ञ व ईएनटी तज्ज्ञांच्या सहभागासह आरोग्य यंत्रणेची ऑनलाईन बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, बालरोगतज्ज्ञ डॉ. सुमीत लहाने, डॉ. महल्ले, डॉ. पाचबुद्धे यांच्यासह अनेक बालरोगतज्ज्ञ व ईएनटी तज्ज्ञ या ऑनलाईन बैठकीला उपस्थित होते.

पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या की, नव्याने उभ्या राहणाऱ्या अडचणींवर वेळीच मात करणे आवश्यक आहे. लहान मुलांना तिसऱ्या टप्प्यात अधिक धोका असल्याची तज्ज्ञांचे मत आहे. ते लक्षात घेऊन आवश्यक उपचार सुविधा उभारणे आवश्यक आहे. त्यामुळे लहान मुलांसाठी सर्व उपचार सुविधांची सुसज्ज असा स्वतंत्र वॉर्ड उभारण्यात यावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

----------

सुपर स्पेशालिटीच्या ‘फेज-वन’ इमारतीत होणार वॉर्ड

लहान मुलांसाठी स्वतंत्र वॉर्ड सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील फेज-वन इमारतीत उभारण्याचा निर्णय झाला. लहान मुलांमधील उपचाराबाबत मार्गदर्शन, प्रतिबंधात्मक औषधे, आवश्यक साधन सामग्री व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याबाबत तात्काळ हालचाली करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

--------------

म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड

म्युकरमायकोसिस रोगाचा प्रादुर्भाव कोरोना रुग्णांमध्ये आढळत आहे. त्यामुळे अशा रुग्णांसाठी सर्व सुसज्ज उपचार सुविधांसह स्वतंत्र वॉर्ड असणे आवश्यक आहे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. त्यानुसार जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड उभारण्याचा निर्णय झाला. लहान मुलांसाठी सुसज्ज आरोग्य यंत्रणा उपलब्ध असण्याच्या दृष्टीने बालरोगतज्ज्ञांचा टास्क फोर्स तसेच म्युकरमायकोसिस आजाराचाही काही ठिकाणी आढळलेला प्रादुर्भाव पाहता, ईएनटी तज्ज्ञांचाही समावेश असलेले पथक गठित करण्यात आले आहे.

-------------------

म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार

म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेत मोफत उपचार करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या आजारावरील औषध महागडे आहे. त्यामुळे महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सहभागी असलेल्या एक हजार रुग्णालयांमध्ये या आजाराच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत. या आजाराच्या जाणीवजागृतीबाबत मोहीम हाती घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

--------------

ही म्युकरमायकोसिसची लक्षणे

ज्या कोरोनाग्रस्तांना अनियंत्रित मधुमेह आहे, त्यांच्यामध्ये म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराची लक्षणे आढळून येत आहे. या आजारात नाकाजवळ, ओठाजवळ काळसर ठिपका आढळून येतो. वेळेत उपचार न झाल्यास डोळे, श्वसन व मेंदूवर विपरीत परिणाम होऊ शकतो. या आजाराचे लवकर निदान होणे गरजेचे असते. या आजारामुळे कोरोना रुग्णांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. मधुमेह असणाऱ्यांनी तो नियंत्रित ठेवावा. त्यासाठी व्यायाम, योग्य आहार व डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करण्याची सूचना आरोग्य विभागाने केली आहे.

000

Web Title: Separate ward for treatment of mucomycosis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.