अर्धवट उड्डाणपूल राणांकडून सुरू, खराटेंकडून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 10:44 PM2018-03-31T22:44:54+5:302018-03-31T22:44:54+5:30
बांधकाम पूर्ण होण्यास एक वर्षाचा कालावधी अपेक्षित असताना आ. रवी राणा यांनी राजापेठ स्थित अर्धवट उड्डाणपुलाचे शनिवारी सकाळी लोकार्पण केले. ३१ मार्चला हा उड्डाणपूल आपण वाहतुकीसाठी खुला करू, अशी घोषणा त्यांनी तीन दिवसांपूर्वी केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बांधकाम पूर्ण होण्यास एक वर्षाचा कालावधी अपेक्षित असताना आ. रवी राणा यांनी राजापेठ स्थित अर्धवट उड्डाणपुलाचे शनिवारी सकाळी लोकार्पण केले. ३१ मार्चला हा उड्डाणपूल आपण वाहतुकीसाठी खुला करू, अशी घोषणा त्यांनी तीन दिवसांपूर्वी केली होती. त्यानुसार त्यांनी एका आॅटोरिक्षाचालकाच्या हस्ते फीत कापून हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केला. मात्र, राणा यांची पाठ फिरताच तेथे ‘वाहतुकीसाठी बंद अन् काम सुरू’ असा फलक झळकला. वाहतूक पोलिसांपाठोपाठ शिवसेनेनेही उड्डाणपुलावरील वाहतूक बंद केली. त्या पार्श्वभूमीवर राणा यांनी केलेले लोकार्पण ‘फार्स’ ठरले.
आ. राणांच्या घोषणेनंतर खा. आनंदराव अडसूळ व आ. सुनील देशमुख यांनी शुक्रवारी उड्डाणपुलाची पाहणी करून महापालिका, कंत्राटदार व अन्य यंत्रणांकडून जोपर्यंत ‘नाहरकत’ मिळणार नाही तोपावेतो, रस्ता वाहतुकीसाठी खुला करणे हे जोखमीचे असेल, असे बजावले होते. राजापेठ स्थित उड्डाणपुलाची एक बाजू किमान महिन्याभरानंतर वाहतुकीसाठी खुली करणे शक्य असल्याचे मत महापालिकेतर्फे व्यक्त करण्यात आले होते. मात्र, ती वस्तुस्थिती नाकारून आ. राणा यांनी शनिवारी सकाळी राजापेठ गाठून आॅटोरिक्षाचालक, स्कूल बसचालक व शहर बसचालकाच्या हस्ते फीत कापून वाहतूक सुरू केली. येथे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आ. राणांना ते अडवू शकले नाहीत.
तत्पूर्वी, राणा यांनी या ठिकाणी हनुमान चालिसाचे वितरण केले. यावेळी युवा स्वाभिमान संघटनेचे तिन्ही नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राणा यांनी यानंतर कार्यकर्त्यांसमवेत राजापेठ पोलीस ठाण्यातील हनुमंताचे दर्शन घेतले.
शिवसेनेकडून राणांचा निषेध
आ. राणा यांनी उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू केल्याच्या काही वेळानंतरच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी तो मार्ग बंद केला. तेथे राणा यांच्याविरोधात घोषणाबाजी करीत राणांवर प्रसिद्धीलोलुपतेचा आरोप करण्यात आला. राणा सवंग प्रसिद्धीखोर असल्याचे खराटे म्हणाले. यावेळी शहरप्रमुख प्रशांत वानखडे, प्रवीण हरमकर, राहुल माटोळे, विकास शेळके आदींची उपस्थिती होती.
अडसूळ विकासविरोधी रावण
अर्धवट उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यानंतर आ. राणा यांच्या संपर्क कार्यालयातून पाठविण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात खा. आनंदराव अडसूळ यांना विकासविरोधी रावणाची उपमा देण्यात आली आहे. ‘मागील नऊ वर्षाच्या कालावधीत विकासाचे एकही रोपटे न लावणारे विकासविरोधी रावण अडसूळ’ यांचा निषेध करुन राजापेठ उड्डाणपूल जनतेच्या सेवेत सुरू झाल्याची माहिती या पत्रकातून देण्यात आली.
शुक्रवारी या उड्डाणपुलाची पाहणी केली. येथे बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच वाहतूक सुरु करण्याची घाई न करण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यानंतरही नौटंकी करण्यात आली. जातिवंत आरक्षणचोरांना ‘कोण राम अन् कोण रावण’ हे जनताच दाखवून देईल.
- आनंदराव अडसूळ, खासदार