२२ सप्टेंबरला ' दिवस व रात्र ' समान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:13 AM2021-09-18T04:13:40+5:302021-09-18T04:13:40+5:30
अमरावती : दर वर्षाला पृथ्वीवर २१ मार्च व २२ सप्टेंबर या दिवशी दिवस व रात्र प्रत्येकी १२ तासांचे म्हणजे ...
अमरावती : दर वर्षाला पृथ्वीवर २१ मार्च व २२ सप्टेंबर या दिवशी दिवस व रात्र प्रत्येकी १२ तासांचे म्हणजे समान असतात. या विशेष तारखांना खगोलशास्त्रात ' विषुव दिन ' असे म्हणतात. दिवस व रात्र नेहमी लहान मोठे असतात. दिवस रात्रीची ही असमानता पृथ्वीच्या आसाच्या कलण्यामुळे निर्माण होते. पृथ्वीचा अक्ष हा २३.५ अंशाने कललेला आहे. जो गोलार्ध सूर्याकडे कलतो, त्या गोलार्धात दिवस १२ तासापेक्षा मोठा व रात्र १२ तासापेक्षा लहान असते. जेव्हा कोणताही गोलार्ध सूर्याकडे कललेला नसतो तेव्हा पृथ्वीवर दिवस व रात्र समान असते. म्हणजेच १२-१२ तासांचे असते. पृथ्वीच्या परांचन गतीमुळे या दिवसात दर वर्षाला थोडा फरक पडू शकतो २१ मार्च व २२ सप्टेंबर या दिवशी पृथ्वीचा कोणताही गोलार्ध सूर्याकडे कललेला नसतो. दोन्हीही गोलार्ध सूर्यापासून समान अंतरावर असतात. या दोन्ही दिवशी प्रकाशवृत्त उत्तर व व दक्षिण ध्रुवातून जाते, म्हणून २१ मार्च व २२ सप्टेंबर या दिवशी दिवस व रात्र प्रत्येकी १२ तासांचे म्हणजे समान असतात. आकाशात वैषुविक आणि आयनिक वृत्तांचे दोन काल्पनिक छेदनबिंदू आहेत. त्यापैकी एका बिंदूतून २१ मार्च रोजी सूर्य प्रवेश करतो त्याला वसंत संपात बिंदू असे म्हणतात. तर त्याच्या विरुद्ध बिंदूत २२ सप्टेंबर रोजी सूर्य प्रवेश करतो . त्याला शरद संपात बिंदू असे म्हणतात.
--------------------
खगोलप्रेमी, भूगोल अभ्यासकांना पर्वणी
खगोलप्रेमी अथवा भूगोलाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी २२ सप्टेंबर या दिवस व रात्रीचे प्रत्यक्ष कालमापन करावे आणि या दिवसाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन मराठी विज्ञान परिषद अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी केले आहे.