सप्टेंबर ब्लास्ट, सात दिवसांत १६००
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 05:00 AM2020-09-09T05:00:00+5:302020-09-09T05:00:40+5:30
‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत शासन अन् जिल्हा प्रशासनाने निर्बंध हटविले. याचा अर्थ बेलगाम होणे नाही. किंबहुना या मोकळेपणात स्वत:ला अधिक सुरक्षित ठेवणे व सोबतच परिवारालादेखील जपणे महत्वाचे आहे. मात्र, याचे उलट चित्र आता दिसायला लागले आहे. तरुणाई चेहऱ्याऐवजी हनुवटीला मास्क लावत आहे. २५ टक्के लोक मास्क वापरायचे टाळताहेत. कुठेही जा फिजिकल डिस्टंन्सिंगचा बोऱ्या वाजला आहे.
गजानन मोहोड।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : केवळ चाचण्यांची संख्यावाढ झाल्यानेच नव्हे तर लॉकडाऊन-४ शिथिलतेनंतर प्रशासन अन् नागरिकांच्या बेपर्वाईनेदेखील कोरोनाग्रस्तांची संख्यावाढ होत आहे. सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यात कोरोनाचा ब्लास्ट झालेला आहे. सात दिवसांत तब्बल १,५९९ कोरोना संक्रमितांची नोंद झाल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे.
जिल्ह्यात या आठवड्यात तपासणी झालेल्या नमुन्यांमध्ये पॉजिटिव्हचे प्रमाण हे विदर्भात सर्वाधिक २५ टक्क्यांपर्यत पोहोचले आहे. १५ आॅगस्टनंतर या प्रमाणात सातत्याने होत असलेली संक्रमित रुग्णांची वाढ चिंताजनक आहे. याहीपेक्षा धक्कादायक म्हणजे कोरोनाग्रस्तांचा मृत्यूदर आता ३ टक्कयांपर्यत पोहोचला आहे. त्यामुळे प्रशासनाला वेळीच पावले उचलावी लागणार आहे. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर तर जाणार नाही, अशी भीती निर्माण झालेली आहे.
‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत शासन अन् जिल्हा प्रशासनाने निर्बंध हटविले. याचा अर्थ बेलगाम होणे नाही. किंबहुना या मोकळेपणात स्वत:ला अधिक सुरक्षित ठेवणे व सोबतच परिवारालादेखील जपणे महत्वाचे आहे. मात्र, याचे उलट चित्र आता दिसायला लागले आहे. तरुणाई चेहऱ्याऐवजी हनुवटीला मास्क लावत आहे. २५ टक्के लोक मास्क वापरायचे टाळताहेत. कुठेही जा फिजिकल डिस्टंन्सिंगचा बोऱ्या वाजला आहे. प्रशासन अस्तित्वात आहे की कसे, असा प्रश्न पडू लागला आहे. महापालिका क्षेत्र असो की ग्रामीण या दोन्ही ठिकाणी परिस्थिती सारखीच आहे. जिल्हा ग्रामीणमध्ये या दोन आठवड्यात काही गावे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. त्यातल्यात्यात हजारांवर गावांनी विषाणू संसर्गाला वेशीवर रोखले, हे चित्र कोरोना संकटाकाळात दिलासाजनक आहे. यात प्रशासनाने पाठ थोपटून घेण्यासारखे काहीही नाही. या गावांनी स्वयंशिस्त पाळल्यानेच त्यांनी कोरोनाचा संसर्ग रोखला, ही वस्तूस्थिती आहे. या गावांपासून इतर गावांनी धडा घेणे वाढत्या कोरोना संसर्गाचे काळात महत्वाचे आहे. तरच कोरोनाची साखळी ब्रेक करता येणार आहे.
लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आलेली असली तरी प्रतिबंधात्मक क्षेत्रांमध्ये कुठलीही सूट देण्यात आलेली नाही. प्रत्यक्षात या सर्व झोनमध्ये सर्वकाही खुले झालेले आहे. त्यामुळेही संसर्ग वाढायला लागला असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.
आठवडाभरातील तपासणी
जिल्ह्यात आरटी-पीसीआर, रॅपीड अॅन्टीजेन व ट्रुनेट मशीनद्वारा संकमितांच्या नमुन्यांची तपासणी केली जाते. या आठवड्यात डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषाणू परिक्षण लॅबमध्येही नमुन्यांची तपासणी होत आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अहवालानुसार ३१ ऑगस्टला १०६९ नमुने, १ ऑगस्टला ११४७ नमुने, २ ला ५२९ नमुने, ३ ला ११४२ नमुने, ४ ला १८३४ नमुने, ५ ला १०१४ नमुने, ६ ला ३३६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १५९९ नमुने पॉझिटिव्ह आलेले आहे. काही नमुने नागपूर येथील दोन खासगी लॅबमध्ये तपासणी करण्यात आलेले आहे. अलिकडे त्वरित अहवाल मिळत आहे.
७ दिवसांत १,३५७ रुग्ण कोरोनामुक्त
जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातील सात दिवसांत १,३५७ रुग्णांना उपचारानंतर बरे वाटल्याने त्यांना घरी सोडण्यात आलेले आहे. या रुग्णांना १४ दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे. यामध्ये १ ऑगस्टला संक्रमणमुक्त रुग्णांची संख्या होती, २ ला ४५८६, ३ ला ४७६३, ४ ला ४९४२, ५ ला ५०७३, ६ ला ५२६२, ६ ला १४७४ रुग्ण पॉझिटिव्हचे निगेटिव्ह झालेले आहे. कोरोनामुक्त होण्याचा दर ७४.८८ आहे. सुरुवातीला १७, १८ व्या दिवशी सलग तीन चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर डिस्चार्ज दिल्ला जायचा. आता ७ ते १० दिवसांत डिस्चार्ज मिळतो.