सेवाज्येष्ठता यादीत घोळ ?
By admin | Published: June 27, 2017 12:02 AM2017-06-27T00:02:01+5:302017-06-27T00:02:01+5:30
महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केलेली कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादी संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
महापालिका कर्मचाऱ्यांचा आक्षेप : पदोन्नतीची प्रक्रिया केव्हा?
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केलेली कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादी संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. मर्जीतील कर्मचाऱ्यांकरवी या यादीत जाणूनबुजून घोळ घातल्याचा आक्षेप असून जीएडीच्या कार्यप्रणालीबाबत संताप व्यक्त होत आहे.
सन २०१५ नंतर वर्षभराचा ब्रेक घेऊन जीएडीने मागील आठवड्यात महापालिका आस्थापनेवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादी तयार केली. सन २०१६ मध्ये तांत्रिक कारणास्तव सेवाज्येष्ठता यादी जाहीर करण्यात आली नव्हती. यंदा ती यादी तयार करण्यात आली असली तरी ती सदोष असल्याचा ठपका अनेक कर्मचाऱ्यांनी ठेवला आहे. कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, अधीक्षक अशा संवर्गनिहाय कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठतेत यादीवर या १७५० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचे प्रशासकीय भवितव्य, पदोन्नती अवलंबून आहे. तथापि अन्य विभागातील मर्जीतील कर्मचाऱ्यांची मदत घेऊन जीएडीने कनिष्ठाला वरिष्ठ आणि वरिष्ठाला कनिष्ठ केल्याचा आक्षेप आहे. अनेकांच्या सेवाज्येष्ठतेचा अनुक्रमांकही जाणूनबुजून बदलविण्यात आला. यासाठी पाणीपुरवठा विभागातील एका वादग्रस्त कर्मचाऱ्यांची मदत घेतल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. जीएडीमध्ये पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असताना त्या ‘बदनाम’ कर्मचाऱ्यांची मदत का घेतली जात आहे, तो कर्मचारी जीएडीतील महत्त्वपूर्ण आणि कर्मचाऱ्यांचे नोकरीविषयक भवितव्य असलेली सेवाज्येष्ठता यादी हाताळत असेल तर अधीक्षकांनी त्याबाबत उपायुक्तांची परवानगी घेतली आहे का, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
उपायुक्तांनी घालावे लक्ष
जीएडीचा बिघडलेला ताल सुव्यवस्थित करण्याचे आव्हान उपायुक्त प्रशासन महेश देशमुख यांच्यासमोर उभे ठाकले आहे. देशमुखांची प्रतिमा शिस्तप्रिय असल्याने त्यांनी जीएडीला शिस्त लावावी, जीएडीमधील बाहेरच्यांच्या शिरकावाला प्रतिबंध घालावा, कंत्राटीऐवजी महापालिका आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांकडून काम करुन घ्यावी, अशी अपेक्षा आहे.
पदोन्नती केव्हा?
शेकडो महापालिका कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची प्रतीक्षा आहे. सेवाज्येष्ठता ही केवळ यादीपुरती मर्यादित न राहता प्रशासनाने आकृतीबंध आणि सेवाप्रवेशनियम अंतिम करुन पदोन्नतीची प्रक्रिया करावी, अशी मागणी आता तीव्र होऊ लागली आहे. अनेक कर्मचारी पदोन्नतीविनाच सेवानिवृत्त झाल्याने आपलेही तसेच होणार की काय, अशी भीती महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सतावत आहे.
प्रभारींची सर्कस
मागील अनेक वर्षांपासून महापालिका कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पदाचा प्रभार देऊन त्यांची तात्पुरती बोळवण करण्यात आली आहे. अनेक कनिष्ठ लिपिक अधीक्षकपदावर कार्यरत असून अधीक्षक दर्जाचे कर्मचारी मात्र पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत.
महापालिका आस्थापनेवरील १७५० कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादी तयार करण्यात आली. ३ जुलैपर्यंत त्यावर आक्षेप, हरकती नोंदविता येतील.
- दुर्गादास मिसाळ,
अधीक्षक, सामान्य प्रशासन विभाग