मतमोजणीच्या प्रारंभापर्यंत स्वीकारणार सेवा दलाचे पोस्टल बॅलेट, सद्य:स्थितीत ५०४३ प्राप्त
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: May 8, 2024 09:35 PM2024-05-08T21:35:33+5:302024-05-08T21:36:01+5:30
अमरावती लोकसभा मतदारसंघात २६ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये आठ हजारांवर अधिकारी व कर्मचारी निवडणूक कर्तव्यात सहभागी होते. यापैकी ५६४८ जणांना इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट देण्यात आले होते.
अमरावती : लोकसभा मतदारसंघात २६ एप्रिल रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली. यामध्ये २६८९ सेवा कर्मचाऱ्यांना ‘ईटीपीबीएस‘ प्रणालीद्वारे मतपत्रिका ८ एप्रिल रोजी पाठविण्यात आल्या आहेत. यापैकी मंगळवारपर्यंत ९४२ प्राप्त आहेत. या मतपत्रिका मतमोजणीच्या दिवसापर्यंत म्हणजेच ४ जूनला सकाळी ८ पर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत.
अमरावती लोकसभा मतदारसंघात २६ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये आठ हजारांवर अधिकारी व कर्मचारी निवडणूक कर्तव्यात सहभागी होते. यापैकी ५६४८ जणांना इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट देण्यात आले होते. त्यामुळे या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे त्यांची ड्युटी असलेल्या संबंधित मतदान केंद्रांवर उमेदवार प्रतिनिधीच्या समक्ष मतदान झालेले आहे. शिवाय काही कर्मचारी अन्य मतदारसंघात आहेत. त्यांना पोस्टल बॅलेट देण्यात आले होते. ते येथे ठेवलेल्या बॉक्समध्ये प्राप्त झालेले आहेत.
शिवाय सेना दलातील २६८९ मतदारांना ‘ईटीपीबीएस’ या प्रणालीद्वारा उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप झाल्यानंतर मतपत्रिका त्यांच्या संबंधित अभिलेख कार्यालयात पाठविण्यात आल्या होत्या व त्यानंतर या मतपत्रिका पोस्टाद्वारे संबंधित कक्षाला प्राप्त होत आहेत. ७ मेपर्यंत ९४२ मतपत्रिका पोस्टाद्वारे प्राप्त झाल्याची माहिती नोडल अधिकारी यांनी ‘लोकमत’ला दिली.
मतदानाची स्थिती (७ मे पर्यंत)
ज्येष्ठ, दिव्यांगांचे गृहमतदान : ११०४
अत्यावश्यक सेवा (पोलिस) : ०७
‘ईटीपीबीएस’ मतपत्रिका : ९४२
पोस्टल बॅलेट पेटीमध्ये : २९९०
एकूण झालेले मतदान : ५०४३
सहा टेबलसाठी सात तहसीलदार अन् कर्मचारी !
मतमोजणीला येथील लोकशाही भवनात प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी १८ टेबल राहणार आहेत. याशिवाय पोस्टल बॅलेटसाठी सहा टेबलचे नियोजन निवडणूक विभागाद्वारा करण्यात आलेले आहे. यासाठी सात तहसीलदार व अन्य कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. शिवाय उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांचीदेखील नियुक्ती पोस्ट बॅलेटसाठी करण्यात आलेली आहे.
लोकसभा मतदारसंघासाठी ७१०५ पैकी मंगळवारपर्यंत ५०४३ पोस्टल बॅलेट प्राप्त आहे. याशिवाय ‘ईटीपीबीएस’ संबंधित मतपत्रिका मतमोजणी दिवशी सकाळी ८ पर्यंत स्वीकारण्यात येतील.
ज्ञानेश घ्यार
नोडल अधिकारी तथा
उपजिल्हाधिकारी (रोहयो)