राणा दाम्पत्याला सशर्त जामीन मंजूर; अमरावतीत कार्यकर्त्यांचा जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2022 01:22 PM2022-05-04T13:22:57+5:302022-05-04T13:41:12+5:30
राणा दाम्पत्याला जामीन मिळताच अमरावतीत कार्यकर्त्यांचा जल्लोष. कार्यकर्त्यांनी ढोल ताशावर धरला ताल
अमरावती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचे आव्हान दिल्यानंतर अटकेची कारवाई झालेल्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा या दाम्पत्याला अखेर जामीन मंजूर झाला आहे. यानंतर अमरावतीत कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबई सत्र न्यायालयाने आज राणा दाम्पत्याला जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. जवळपास १२ दिवस कोठडीत राहिल्यानंतर राणा दाम्पत्याला सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यामुळे अमरावतीत कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे. अमरावतीतील राणा यांच्या घरी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून ढोल ताशावर ताल धरला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निवासस्थान मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याचे आव्हान देणाऱ्या राणा दाम्पत्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाल्यानंतर या दाम्पत्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यातच राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाच्या गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्यासमोरील अडचणी वाढल्या होत्या. दरम्यान, जामिनासाठी प्रयत्नशील असलेल्या राणा दाम्पत्याच्या जामीर अर्जावर सोमवारी मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली होती. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण झाले होते. मात्र न्यायालयाने राणा दाम्पत्याच्या जामिनावरील निकाल राखून ठेवला होता. त्यामुळे राणा दाम्पत्याच्या तुरुंगातील मुक्कामात वाढ झाली होती. मात्र अखेर आज कोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे.