कोरोना मृतांच्या अंत्यविधीसाठी शहराबाहेर निर्जन स्थळी स्मशानभूमी उभारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:13 AM2021-04-21T04:13:37+5:302021-04-21T04:13:37+5:30
रवि राणांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, नागरी वस्तीत धुराचे कण, राख हवेवाटे कोरोना संक्रमणाचा धोका अमरावती : शंकरनगरातील नागरी वस्तीत असलेल्या ...
रवि राणांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, नागरी वस्तीत धुराचे कण, राख हवेवाटे कोरोना संक्रमणाचा धोका
अमरावती : शंकरनगरातील नागरी वस्तीत असलेल्या हिंदू स्मशानभूमीत कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहाचा अंत्यविधी करताना उडणाऱ्या धुराचे कण, राख हवेवाटे पसरून संक्रमणाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे कोरोना मृतदेहांच्या अंत्यविधीसाठी शहराबाहेर १० किमी अंतरावर निर्जन स्थळी शासकीय जागेवर तात्पुरती स्मशानभूमी उभारावी, अशी मागणी आमदार रवि राणा यांनी पत्राद्वारे मंगळवारी केली आहे.
‘लोकमत’ने १६ एप्रिल रोजी ‘स्मशानभूमीत जागा मिळेना, खुल्या जागेवर अंत्यविधी’ या आशयाचे वृत्त प्रकाशित करून स्मशानभूमीतील वास्तव मांडले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासन, महापालिकेने विलासनगर, शंकरनगर व फ्रेजरपुरा येथील स्मशानभूमीत कोरोना मृतदेहांवर अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, आमदार राणा यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची भेट घेऊन शंकरनगर येथील हिंदू स्मशानभूमीबाबत परिसरातील रहिवाशांच्या व्यथा मांडल्या. शहरातील कोणत्याही स्मशानभूमीत कोरोना मृतदेहांवर अंत्यविधी न करता शहराबाहेर १० किमी अंतरावर शासकीय जागेत तात्पुरते स्मशानभूमी उभारून येथे पर्यायी व्यवस्था निर्माण करावी, असे आ. राणा यांनी म्हटले आहे.
अंत्यविधी करतावेळी गॅस दाहिनीत मृतदेहावरील पीपीई किटदेखील जाळली जाते. यातून निघणारा धूर व राखेच्या कणांमुळे कोरोना संक्रमणाची दाट भीती वर्तविली जात आहे. याबाबत स्मशानभूमीलगतच्या नागरिकांच्या भावना संतप्त असल्याची कैफीयत आ. राणांनी जिल्हाधिकाऱ्याच्या पुढ्यात मांडली. विलासनगर, शंकरनगर व फ्रेजरपुरा येथील स्मशानभूमी मध्यवस्तीत आहे. त्यामुळे या स्मशानभूमींमध्ये कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येऊ नये. नागरिकांचा त्यास विरोध आहे. त्याऐवजी शहराबाहेर १० किमी अंतरावर शासकीय जागेवर निर्जन स्थळी महापालिका अथवा जिल्हा प्रशासनाने कोरोना मृतांच्या अंत्यविधीसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, असे आमदार राणा यांची आग्रही मागणी आहे.
-----------------
आमदार रवि राणा यांचे पत्र प्राप्त झाले आहे. शहराबाहेर शासकीय जागेचा शोध घेण्यात येईल. स्मशानभूमीच्या अनुषंगाने सुविधांबाबत नियोजन झाल्यावर येथे कोराेना मृतदेहांवर अंत्यविधी केला जाईल.
- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी, अमरावती.