‘डफरीन’च्या नव्या वसाहतीत सुरक्षा रक्षक नेमले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 10:17 PM2018-06-19T22:17:49+5:302018-06-19T22:18:00+5:30
येथील जिल्हा स्त्री रूग्णालय (डफरीन) कर्मचाऱ्यांसाठी साकारलेल्या नव्या वसाहतीत सुरक्षा रक्षक नेमण्यात आले. वसाहतीत काही जुजबी कामे बाकी असून, ते त्वरेने पूर्ण करून ही वास्तू सोयीसुविधांनी हस्तांतरित करावी, असे स्मरणपत्र रूग्णालयाच्या अधीक्षक अर्चना जामठे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला मंगळवारी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथील जिल्हा स्त्री रूग्णालय (डफरीन) कर्मचाऱ्यांसाठी साकारलेल्या नव्या वसाहतीत सुरक्षा रक्षक नेमण्यात आले. वसाहतीत काही जुजबी कामे बाकी असून, ते त्वरेने पूर्ण करून ही वास्तू सोयीसुविधांनी हस्तांतरित करावी, असे स्मरणपत्र रूग्णालयाच्या अधीक्षक अर्चना जामठे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला मंगळवारी दिले.
‘डफरीन’ची नवीन कर्मचारी वसाहत गैरप्रकाराचा अड्डा’ या आशयाखाली १९ जून रोजी ‘लोकमत’ने सचित्र वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर आरोग्य यंत्रणेत एकच खळबळ उडाली. जिल्हा स्त्री रूग्णालयाचे अधीक्षकांनी बांधकाम अभियंता, कंत्राटदार यांचेशी संपर्क साधला. वसाहतीत वीज, पाणीपुरवठा त्वरित करून ही वास्तू हस्तांतरित करावी, असे कळविले. नवी वसाहत हस्तांतरित होईस्तोवर सुरक्षा रक्षकांची व्यवस्था करावी, अशी तंबी जामठे यांनी कंत्राटदाराला भ्रमणध्वनीवरून दिली. येथे गैरप्रकाराला आळा बसावा, यासाठी तात्पुरत्या स्वरूपात डफरीन, सुपर स्पेशालिटी रूग्णालयात कार्यरत सुरक्षा रक्षकांवर जबाबदारी सोपविली आहे. जूनअखेर ही वास्तू ताब्यात घेऊन कर्मचाºयांना निवासासाठी हस्तांतरित केली जाईल, असा निर्णय आरोग्य यंत्रणेने घेतला आहे. येथे वीज, पाणी पुरवठ्याची वानवा असल्याबाबत आरोग्य संचालकांना पत्र पाठविले आहे.
नव्या वसाहतीच्या संरक्षणासाठी सुरक्षा रक्षक नेमले आहे. जूनअखेर ही वास्तू ताब्यात घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार सुरू झाला आहे. या गंभीर प्रकाराबाबत आरोग्य संचालकांना अवगत केले.
- अर्चना जामठे,
अधीक्षक, जिल्हा स्त्री रूग्णालय, अमरावती