उष्मघाताच्या रुग्णांसाठी इर्विनमध्ये दोन स्वतंत्र वार्डची व्यवस्था
By उज्वल भालेकर | Published: April 20, 2023 07:41 PM2023-04-20T19:41:26+5:302023-04-20T19:41:40+5:30
उन्हाचा तडाखा वाढला : आरोग्य प्रशासन सतर्क, नागरिकांना आवाहन
अमरावती : जिल्ह्यात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला असून, दुपारच्या सुमारास घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. जिल्ह्यातील तापमान हे ४३ अंशांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हामध्ये उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा आरोग्य प्रशासन सतर्क असून, जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्माघाताच्या रुग्णांसाठी दोन वाॅर्डात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
राज्यात सूर्य सर्वत्रच आग ओकत आहे. अशातच नुकताच पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात भरउन्हात हजेरी लावलेल्या सहाशेच्या जवळपास नागरिकांना उष्माघाताचा त्रास, तर १२ नागरिकांचा मृत्यू देखील झाला. त्यामुळे उष्माघातापासून बचावासाठी त्वरित उपाय योजना आवश्यक आहे. माणसाच्या शरीरामध्ये नॉर्मल तापमान हे ३७ अंश डिग्री सेल्सिअस इतके असते. त्यामुळे शरीरातील तापमान यापेक्षा जास्त वाढले तर घाम येतो आणि शरीर थंड होण्याची प्रक्रिया सुरू होते. शरीरातील पाणी संपले तर घाम येणे बंद होऊन तोंडाला कोरडा पडून उष्माघाताची शक्यता वाढते. त्यामुळे उन्हामध्ये बाहेर पडताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. त्याच अनुषंगाने जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्माघाताच्या महिला रुग्णांसाठी वाॅर्ड क्रमांक एक, तर पुरुष रुग्णांसाठी वाॅर्ड क्र. आठमध्ये स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
उष्माघातापासून अशी घ्या काळजी
उष्माघात होऊ नये यासाठी विशेष कळजी घेणे गरजचे आहे. यामध्ये वाढत्या उन्हामध्ये कष्टाची कामे करणे टाळावी, उष्णता शोषून घेणारे कपडे घालावेत, उन्हामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करू नये, भरपूर प्रमाणात पाणी प्यावे, घराबाहेर पडताना छत्री, टाेपी किंवा चेहऱ्यावर कपडा बांधावा, अशक्तपणा असेल तर त्वरित डॉक्टरांना दाखवावे.
उन्हाचा वाढता तडाखा लक्षात घेता, जिल्हा सामान्य रुग्णालयात वाॅर्ड एक व आठमध्ये उष्माघाताच्या रुग्णांसाठी व्यवस्था केली आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयातही उष्माघाताच्या रुग्णांसाठी प्रत्येकी दोन बेडची व्यवस्था केली आहे. जिल्ह्यात सध्यातरी उष्माघाताचा एकही रुग्ण आढळलेला नाही.-डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा शल्यचिकित्सक