विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रश्नांवर सोमवारी तोडगा !
By admin | Published: June 13, 2016 01:43 AM2016-06-13T01:43:08+5:302016-06-13T01:43:08+5:30
गत १२ दिवसांपासून विनाअनुदानित शिक्षकांचे विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला रविवारी ...
गृहराज्यमंत्र्यांची माहिती : मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार
अमरावती : गत १२ दिवसांपासून विनाअनुदानित शिक्षकांचे विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला रविवारी राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी भेट दिली. सोमवारी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांच्यासोबत संयुक्त बैठक घेऊन अनुदानाबाबत तोडगा काढण्याचा शब्द ना. पाटील यांनी दिला.
ना. रणजित पाटील हे रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास येथील शिक्षण उपासंचालक कार्यालय परिसरात सुरू असलेल्या विनाअनुदानित शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या बेमुदत उपोषणस्थळी पोहचले. ना.पाटील यांनी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक असून काही तांत्रिक बाबी पूर्ण होताच अनुदानासंदर्भात शासन निर्णय निर्गमित होणार असल्याचे ना. पाटील म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी विनाअनुदानित शाळा शिक्षकांच्या अनुदानाचा विषय मार्गी लावण्यासाठी तिजोरीत जमा शिल्लक असलेल्या अनुदानित शाळांच्या निधीतून देण्याची तयारी दर्शविली आहे. हा निधी वळता करताना काही तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी कालावधी लागत असल्याचे ना. पाटील यांनी सांगितले. औरंगाबाद विभागातील गजानन खरात या शिक्षकांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ही बाब दुर्देवी असून सोमवारी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेऊन तोडगा काढला जाईल, असा शब्द ना. पाटील यांनी दिला. यावेळी शिक्षक महासंघाचे शेखर भोयर, कृती समितीचे पुंडलिकराव रहाटे, सुरेश सिरसाट, सुधाकर वाहुरवाघ, गोपाल चव्हाण, आर. जी. पठाण, एन. आर. पठाण, पी. एच. खडसे, विजय कळस्कर व पदाधिकारी यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)