सात कोटींचा हप्ता, तीन लाखांची भरपाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:13 AM2017-07-21T00:13:06+5:302017-07-21T00:13:06+5:30
नैसर्गिक आपत्तींसह हवामान बदल व इतर बाबींमुळे फळपिकांना होणाऱ्या धोक्यापासून शेतकऱ्यांना संरक्षण मिळावे,
शेतकऱ्यांची थट्टा : फळपीक विमा योजनेचा फोलपणा उघड
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नैसर्गिक आपत्तींसह हवामान बदल व इतर बाबींमुळे फळपिकांना होणाऱ्या धोक्यापासून शेतकऱ्यांना संरक्षण मिळावे, यासाठी जिल्ह्यात हवामानावर आधारित फळपिक योजना सन २०१६-१७ या कालावधीत राबविण्यात आली. यासाठी १७ हजार १२५ शेतकऱ्यांनी २० हजार ४३५ हेक्टर क्षेत्रासाठी १४३ कोटी ७ लाख रूपयांचा विमा संरक्षित केला व सात कोटी १५ लाख ३५ हजारांच्या विमा हप्ता भरला. प्रत्यक्षात केवळ पाच शेतकऱ्यांना तीन लाख २४ हजारांची भरपाई मिळाल्याने विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची थट्टा शासनाने आरंभली असून केवळ विमा कंपन्यांना लाभ देण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप होत आहे.
राष्ट्रीय पीकविमा कार्यक्रमांतर्गत हवामानावर आधारीत फळपीक विमा राज्यात अधिसूचित फळपीकांसाठी राबविण्यात आली. अमरावती जिल्ह्यातील संत्रा, केळी व मोसंबी या फळपीकांचा समावेश यायोजनेत करण्यात आला. संत्रा पिकासाठी १२ तालुक्यांतील ७० महसूल मंडळात अधिसूचित करण्यात आले. पाऊस, तापमान, सापेक्ष आर्द्रता, वेगाचे वारे व गारपीट यापासून विमायोजनेच्या तरतुदीप्रमाणे फळपीकांसाठी निर्धारित कालावधीत शेतकऱ्यांना विमासंरक्षण आणि आर्थिक सहाय्य देणे तसेच हवामान घटकावर आधारित फळपीक नुकसानीच्या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे हा या योजनेचा मुख्य उद्देश होता. जिल्ह्यातील १७ हजार १२५ शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग नोंदविला. प्रत्यक्षात नुकसान भरपाई जाहीर झाल्यानंतर योजनेचा फोलपणा उघड झाला आहे.फळपीकांसाठी पीककर्जाची मर्यादा मंजूर आहे. अशा सर्व कर्जदार शेतकऱ्यांसाठी योजना सक्तीची असून बिगरकर्जदार शेतकऱ्यांसाठी ती ऐच्छिक स्वरूपाची होती. फळपीकांसाठी विमा हप्ता दर १२ टक्के असून राज्य व केंद्र शासनाचे प्रत्येकी ५० टक्के अनुदान यायोजनेत आहे. मात्र, योजनेत सहभागी शेतकऱ्यांना विम्याची भरपाई जाहीर झाली असता विमा कंपनीव्दारा शेतकऱ्यांची थट्टाच करण्यात आल्याची बाब स्पष्ट झाली आहे. अमरावती उपविभागात तीन हजार ७३३ शेतकऱ्यांनी चार हजार ३०७ हेक्टरसाठी ३० कोटी १५ लाख ३७ हजारांचा विमा संरक्षित केला. यासाठी एक कोटी ५० लाख ७६ हजारांच्या विमा हप्त्याचा भरणा केला. मात्र, एकाही शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. मोर्शी उपविभागात १० हजार २६३ शेतकऱ्यांनी ११ हजार ९१५ हेक्टरसाठी ८३ कोटी ४३ हजारांचा विमा संरक्षित केला. यासाठी चार कोटी १७ लाख ९६ हजारांचा विमा संरक्षित केला. प्रत्यक्षात पाच शेतकऱ्यांना तीन लाख २४ हजारांची भरपाई देण्यात आली आहे. अचलपूर तालुक्यात तीन हजार १२९ शेतकऱ्यांनी चार हजार २११ हेक्टर हेक्टरसाठी एक कोटी ४७ लाख ४३ हजारांचा विमा संरक्षित केला. योजनेची भरपाई जाहीर झाली असता एकाही शेतकऱ्याला विमा मिळाला नाही.