महापालिकेच्या तिजोरीत सात कोटींची भर
By admin | Published: November 15, 2016 12:11 AM2016-11-15T00:11:23+5:302016-11-15T00:11:23+5:30
पंतप्रधानांचे नोटा बंदीचे धक्कातंत्र स्थानिक स्वराज्य संस्थांचे वारे - न्यारे करणारे ठरले आहे.
आयुक्तांचा पुढाकार : रात्री १२ वाजेपर्यंत स्वीकारल्यात नोटा
अमरावती : पंतप्रधानांचे नोटा बंदीचे धक्कातंत्र स्थानिक स्वराज्य संस्थांचे वारे - न्यारे करणारे ठरले आहे. जी वसुली मार्चपर्यंतही शक्य झाली नसती ती अवघ्या तीन-चार दिवसांत रेकॉर्डब्रेकवर पोहोचली आहे. महापालिकेच्या तिजोरीत शुक्रवारपासून ६.७५ कोटी रुपये जमा झाल्याने यंत्रणेने घेतलेले परिश्रम फळास आले आहे.
सोमवार रात्री १२ वाजेपर्यंत जुने चलन स्वीकारणार असल्याबाबत महापालिकेने मोठी जनजागृती केली. त्याचा परिपाक आणि पाचशे व एक हजाराच्या नोटा घराबाहेर घालण्याच्या खटपटीत कर वसुलीचा आकडा सहा कोटीवर गेला आहे. मंगळवारी रात्री १२ पासून ५०० आणि १ हजारांच्या नोटा चलनातून रद्द होत असल्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. त्याचवेळी स्थानिक स्वराज्य संस्थासह मजीप्रा, महावितरण, सिंचन पाणी पट्टीसाठी जुन्या पाचशे आणि १ हजारच्या नोटा स्वीकारार्ह राहील, असा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्याला १४ नोव्हेंबरची मुदतवाढही देण्यात आली. एलबीटी, मालमत्ता कर, बाजार परवाना शुल्क आणि बांधकाम परवानगी शुल्क ५०० आणि १ हजारांच्या जुन्या चलनात स्वीकारणार असल्याची सुवर्णसंधी महापालिकेने अमरावतीकरांना उपलब्ध करून दिली.
शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसांत अनुक्रमे ३.६५ कोटी आणि ८१ लाख महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले. रविवारी रात्री आठ वाजेपर्यंत ७८ लाख रुपये कर जमा झाल्याची माहिती आयुक्त हेमंत पवार यांनी दिली. सोमवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत १.५१ कोटी रुपये महसूल गोळा झाला.
मोहिमेचे शिलेदार : केंद्र व राज्य शासनाच्या आदेशाची सुवर्णसंधी म्हणून अंमलबजावणी करण्यासाठी सुटी असतानाही शेकडो महापालिका कर्मचारी राबले. आयुक्त, उपायुक्त विनायक औगड, नरेंद्र वानखडे, सहायक आयुक्त निवेदिता घार्गे, सोनाली यादव, महेश देशमुख, योगेश पिठे व मंगेश वाटाणे यांनी अधिनिस्थ कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने रेकॉर्डब्रेक महसूल गोळा केला. नगरसचिव मदन तांबेकर, कार्यकारी अभियंता १ अनंत पोतदार, संजय पवार, मुख्य लेखापाल प्रेमदास राठोड,अतिरिक्त शहर अभियंता जीवन सदार, सिस्टिम मॅनेजर अमित डेंगरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम, उपअभियंता स्वप्निल जसवंते, शाखा अभियंते, कनिष्ठ अभियंते व स्वास्थ निरीक्षकांवर अंमलबजावणीची जबाबदारी सोपविली होती.
यंत्रणेचा सकारात्मक पुढाकार
शुक्रवार व्यतिरिक्त शनिवार,रविवार आणि सोमवारी महापालिकेला सुटी होती.मात्र आयुक्त हेमंत पवार यांनी पुढाकार घेऊन करवसूलीसाठी सर्व अधिनिस्थ यंत्रणेला कामी लावले. रजेवर असलेल्या अधिकाऱ्यांना कार्यालयात बोलावण्यात आले.यंत्रणेतील प्रत्येकाची मदत घेऊन करवसूलीची मोहिम फत्ते करण्यात आली.त्यामुळे वरिष्ट अधिकाऱ्यांसह महापालिकेचा प्रत्येकच अधिकारी कर्मचारी अभिनंदनास पात्र ठरला.
आयुक्तांनी काढले आदेश
रद्द करण्यात आलेल्या ५०० आणि १ हजारांच्या नोटांमध्ये महापालिकेचे विविध कर भरण्यास १४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाल्याच्या पार्श्वभूमिवर महापालिका आयुक्तांनी खास आदेश काढलेत.महापालिकेच्याक वसूलीत मोठा फायदा होण्याच्या दृष्टीकोनातून त्यांनी उपायुक्त ,सहायक आयुक्तांच्या साथीला ११ अधिकाऱ्यांवर महत्वाची जबाबदारी सोपविली.सोमवारी रात्री १२ पर्यंत मालमत्ता कर वसूलेची कारवाई करावी तसेच दर एक तासाने वसूलीचा अहवाल सोशल मिडीयाच्या साह्याने सादर करावा आणि विविध करांची मोठ्या प्रमाणात वसूली करण्याचा प्रयत्न करावा.