सात दरोडेखोरांना अटक

By admin | Published: January 25, 2016 12:15 AM2016-01-25T00:15:27+5:302016-01-25T00:15:27+5:30

तुर चोरी प्रकरणातील सात दरोडाखोरांना शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले.

Seven dacoits arrested | सात दरोडेखोरांना अटक

सात दरोडेखोरांना अटक

Next

सात गुन्ह्यांचीही कबुली : गुन्हे शाखेची यशस्वी कामगिरी
नांदगाव खडेश्वर : तुर चोरी प्रकरणातील सात दरोडाखोरांना शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांनी आणखी सात गुन्ह्याची कबुली दिली असून आरोपीजवळून मालवाहू वाहन जप्त करण्यात आले आहे.
किशोर शंकर पवार (३२), विकास आसाराम भोसले (१८,दोन्ही राहणार अशोक नगर, पारधी बेडा, नेर), अनिस खाँ मुस्तफा खाँ (३२), शहजाद शहा रशिद शहा (२५), नसरुल्ला खाँ अन्सार खाँ(२४), शेख जावेद शेख कय्युम (३०) व शहादत खाँ अबरार खाँ (२६,सर्व राहणार नवाबपुरा, नेर) अशी आरोपींची नावे आहेत. नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्यांतर्गत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २० जानेवारी रोजी दरोडा पडला.

शस्त्राच्या धाकावर लुटले
नांदगाव खडेश्वर : अज्ञात दरोडोखोरांनी चार चौकीदारांना लाठी व धारदार शस्त्राचा धाक दाखवून बाजार समितीमधील १० क्विंटल ७० हजारांची तूर मालवाहू वाहनात टाकून चोरून नेली होती. या घटनेत महादेव टसनकर (रा. नांदगाव खंडेश्वर) यांच्या तक्रारीवरून नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द भादंविच्या कलम ३९५ अन्वये गुन्हा नोंदविला.
तसेच यापूर्वीही १ जानेवारी रोजी बाजार समितीच्या आवारातून १४ क्विंटल ५० हजारांची तुर चोरीला गेली होती. या वारंवार घडलेल्या घटना व शेतमालावर चोरांचे लक्ष असल्याचे पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांच्या लक्षात आले. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षकांनी गाभीर्याने दखल घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक नागेश चतरकर यांच्या नेतृत्वात विशेष पथक तयार केले. त्यांना तपासकार्यासाठी योग्य निर्देश दिले. या पथकाने जिल्ह्यातील तसेच स्थानिक मालवाहू वाहनांची चौकशी सुरू करून अशाप्रकारच्या गुन्ह्यामधील गुन्हेगारांची माहिती गोळा केली.
दरम्यान आरोपी किशोक शंकर पवार व त्यांचे काही साथीदार संशयरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांनी संशयीत आरोपींबाबत चौकशी केली असता त्यांच्या टोळीचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ सूत्रे हलवून सातही आरोपीसाठी विविध ठिकाणी सापळा रचून अटक केली. पोलिसांनी आरोपीजवळून मालवाहू क्रमांक एमएच २९- ए.बी.२९४८ जप्त केले असून चौकशीत आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक लखमी गौतम व अपर पोलीस अधीक्षक एम.एम. मकानदार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधीर हिरडेकर, सहायक पोलीस निरीक्षक नागेश चतरकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक मुलचंद भांबुरकर, अरुण मेटे, त्र्यंबक मनोहरे, देवीदास शेंडे, पोलीस कर्मचारी सचिन मिश्रा, गजेंद्र ठाकरे, अमित वानखडे, शकील चव्हाण, शैलेश तिवारी व अब्दूल सईद, गणेश मांडोकर यांनी केली.

सात दरोडेखोरांना अटक करण्यात आली असून शेतमालांच्या चोरीसह अन्य काही गुन्ह्यात त्यांचा सहभाग आहे. या आरोपींसंदर्भात सर्व पोलीस अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे.
- लखमी गौतम,
पोलीस अधीक्षक.

Web Title: Seven dacoits arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.