अतिक्रमणधारकांना सात दिवसांचा अल्टिमेटम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2022 12:01 AM2022-09-29T00:01:54+5:302022-09-29T00:02:54+5:30
भारतातील सहाव्या क्रमांकाच्या अमरावती - नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाले, तेव्हा येथे राष्ट्रसंतांच्या महासमाधीसमोरून बंदिस्त उड्डाणपूल प्रस्तावित होता. परंतु, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीचे व आश्रमाचे महात्म्य लक्षात घेता, त्यावेळी स्थानिक नागरिक व गुरूदेवभक्तांनी बंदिस्त उड्डाणपुलाला तीव्र विरोध करून खुल्या उड्डाणपुलाची मागणी केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : गुरूकुंज मोझरी येथे राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अतिक्रमणाने चार दिवसांपूर्वी एका भावी डॉक्टरचा बळी घेतला होता. त्यामुळे येथील बेकायदेशीर अतिक्रमणाचे प्रकरण चांगलेच तापले. विविध राजकीय पक्ष, संघटना व स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने अवैध अतिक्रमण हटविण्याची मागणी केली व तसे न केल्यास महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता. त्याची दखल घेत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मंगळवारी संबंधित अवैध अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्यासाठी नोटीस बजावली आहे.
भारतातील सहाव्या क्रमांकाच्या अमरावती - नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाले, तेव्हा येथे राष्ट्रसंतांच्या महासमाधीसमोरून बंदिस्त उड्डाणपूल प्रस्तावित होता. परंतु, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीचे व आश्रमाचे महात्म्य लक्षात घेता, त्यावेळी स्थानिक नागरिक व गुरूदेवभक्तांनी बंदिस्त उड्डाणपुलाला तीव्र विरोध करून खुल्या उड्डाणपुलाची मागणी केली होती. त्यामुळे उड्डाणपुलाला पर्यायी व्यवस्था म्हणून याच महामार्गावरून सहा किलोमीटर अंतराचा बायपास रस्ता मंजूर करण्यात आला. त्याची कायदेशीर प्रक्रिया पार पाडून जेमतेम या बायपासच्या कामाला सुरूवात झाली असून, येत्या काही दिवसात हा मार्ग वाहतुकीसाठी पर्याय ठरणार आहे.
दरम्यान, सध्या येथील महामार्गावर दोन्ही बाजूंनी झालेल्या अतिक्रमणाने वाहतुकीची चांगलीच कोंडी निर्माण झाली आहे. शंभर मीटर अंतरावर पादचारी मार्गच तयार करण्यात आला नसल्यामुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची महासमाधी, श्रीगुरूदेव महाविद्यालय व आयुर्वेद रुग्णालय हे एकाच मार्गावर आणि अगदी हाकेच्या अंतरावर असल्यामुळे येथे विद्यार्थी, भाविक व रुग्णांची सदैव रेलचेल असते.
शनिवारी झालेल्या अपघातात भावेश जगनाडे या विद्यार्थ्याचा मृत्यू समाजमनाला चटका लावून गेला. त्यामुळे ‘अतिक्रमण हटाव’चा नारा देण्यात येत आहे. त्याची दखल भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतली. येत्या सात दिवसात अतिक्रमण हटवावे, अन्यथा राष्ट्रीय महामार्ग जमीन व वाहतूक कायदा २००२ कारवाईचा इशारा अतिक्रमणधारकांना देण्यात आला आहे.