कोरोनाचे सात मृत्यू, 727 पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:00 AM2021-02-21T05:00:00+5:302021-02-21T05:00:00+5:30
जिल्ह्यातील कोरोनाच्या उद्रेकावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा व महापालिका प्रशासनाद्वारे बैठकांचा रतीब सुरू आहे. महापालिकेत आयुक्त प्रशांत रोडे यांनी होम आयसोलेशन व स्वॅब सेंटरचा आढावा घेतला, तर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केंद्रांना भेटी दिल्या व सर्व धर्मगुरूंसोबत बैठक घेऊन नागरिकांना कोरोनाप्रति जागरूक होण्याचे आवाहन केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना संसर्गाने शनिवारी सात जणांचा मृत्यू झाला असून पुन्हा ७२७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. २,१३१ नमुन्यांच्या तपासणीतून हा आकडा पुढे आला आहे. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आता २८,८१५ इतकी झाली आहे. राज्यात सर्वाधिक संक्रमित रुग्णांची नोंद अमरावती जिल्ह्यात होत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
जिल्ह्यातील कोरोनाच्या उद्रेकावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा व महापालिका प्रशासनाद्वारे बैठकांचा रतीब सुरू आहे. महापालिकेत आयुक्त प्रशांत रोडे यांनी होम आयसोलेशन व स्वॅब सेंटरचा आढावा घेतला, तर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केंद्रांना भेटी दिल्या व सर्व धर्मगुरूंसोबत बैठक घेऊन नागरिकांना कोरोनाप्रति जागरूक होण्याचे आवाहन केले आहे.
वाढत्या रुग्णसंख्येच्या अनुषंगाने सर्वच तालुक्यांत उपचार केंद्रे सुरू झाली व नागरिकांना स्वॅब देण्यास सोईचे व्हावे, यासाठी स्वॅब सेंटरची संख्या वाढविण्यात आली आहे. शासनस्तरावरदेखील अमरावती जिल्ह्यातील वाढत्या संसर्गाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. शासनाचे अधिकारी दररोज आढावा घेत आहेत. आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांद्वारेही नियमित व्हीसीद्वारे आढावा घेण्यात येत आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात दंडनीय कारवाई सुरू आहे. जिल्ह्यात २४ तासांत उपचारादरम्यान सात कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याने संक्रमितांची मृत्युसंख्या ४६० झाली आहे. कोरोना संसर्गात मृत्यूचे सत्र सुरू झाल्याने जिल्ह्याच्या चिंतेत भर पडली आहे. सीएसच्या माहितीनुसार, शहरातील आनंद विहारातील ३३ वर्षीय तरुण, अर्जुननगरातील ६६ वर्षीय, छांगानीनगरातील ७९ वर्षीय, अंबापेठेतील ८४ वर्षीय, डोंगरयावली येथील ८० वर्षीय पुरुष, दीपनगरातील ६८ वर्षीय व पंचवटी चौकातील ५८ वर्षीय महिलेचा शनिवारी मृत्यू झाला.
महापालिका क्षेत्रात कंटेनमेंट झोन घोषित
शासनाच्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रात पुन्हा कंटेनमेंट झोन जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शनिवारी महापालिका प्रशासनाद्वारे श्रीकृष्ण पेठ, सबनीस प्लॉट, महाजनपुरा, एलआयसी कॉलनी, भाजीबाजार, अनुराधानगर (सद्गुरू धाम कॉलनीजवळ), चंद्रावतीनगर, उषा कॉलनी, भारतनगर (द्वारकानगरजवळ), साईनगर, खंडेश्वर कॉलनी, गोकुळ (उदय कॉलनीजवळ) हे कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत.
रविवारी संचारबंदी
कोरोनाची संसर्गाला ब्रेक लागावा, यासाठी शनिवारी रात्री ८ ते सोमवार सकाळी ८ पर्यंत जिल्हा प्रशासनाने कर्फ्यू घोषित केलेला आहे. त्यामुळे जिल्हा पूर्णपणे ठप्प असणे अपेक्षित आहे.