बेंबळा नदीपात्रातून सव्वासहा लाखांचा गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 11:46 PM2018-03-24T23:46:08+5:302018-03-24T23:46:08+5:30
तालुक्यातील तळेगाव दशासर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेंबळा नदीपात्रातून सव्वासहा लाख रुपये किमतीचा गांजा पोलिसांनी जप्त केला. बेशरमच्या झुडुपांमध्ये गांजाचा हा साठा लपवून ठेवला होता.
आॅनलाईन लोकमत
धामणगाव रेल्वे/तळेगाव दशासर : तालुक्यातील तळेगाव दशासर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेंबळा नदीपात्रातून सव्वासहा लाख रुपये किमतीचा गांजा पोलिसांनी जप्त केला. बेशरमच्या झुडुपांमध्ये गांजाचा हा साठा लपवून ठेवला होता.
येरड-खरबी शिवारातून वाहणाऱ्या बेंबळा नदीच्या काठावर गांजाचे दोन पोते असल्याची माहिती खरबी येथील पोलीस पाटील रामेश्वर मेश्राम (३३) यांनी शुक्रवारी रात्री तळेगाव दशासर पोलीस ठाण्याला दिली. त्यावरून सहायक पोलीस निरीक्षक गोपाल उपाध्याय, पोलीस पथक, धामणगावचे नायब तहसीलदार देवेंद्र सवई व दत्तापूरचे ठाणेदार अशोक लांडे व सहकारी यांनी रात्री ११.३० वाजता घटनास्थळी जाऊन शहानिशा केली. पोलीस पथक तैनात करण्यात आले. रात्र बरीच झाल्याने शनिवारी पहाटे दत्तापूर ठाण्याचे नायक बघेल, संजय भोपळे, नरेश कोलामी, पवन महाजन, वाहनचालक संजय प्रधान, प्रदीप मस्के यांच्या चमूने सहभाग घेतला. घटनास्थळाचा खरबीचे तलाठी अरविंद सराड, टिटवाचे तलाठी नितीन धोटे यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. जप्ती मोहीम राबविण्यात आली.
तळेगावपासून २५ किमी अंतरावर असलेल्या खरबी/येरड शिवारात बेंबळा नदीपात्रात बेशरम वनस्पतीच्या झुडुपाजवळ एक प्लास्टिक ताडपत्री पोलिसांच्या निदर्शनास आली. त्यामध्ये दोन गोणपाटात गांजाचा हिरवा पाला भरला होता. या गांजाचे एकूण वजन ७१.६७० किलो भरले. त्याची ३ लाख ५८ हजार ३५० रुपये किंमत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
पोलिसांना या जागेपासून काही अंतरावर आणखी चार पोते चिकटपट्टीने बंद केलेल्या अवस्थेत आढळून आले. त्याचे एकूण वजन ५३.२२० किलो भरले. त्याची किंमत २ लाख ६६ हजार १०० रुपये आकारण्यात आली आहे.
दोन्ही घटनास्थळावरून ६ लाख २४ हजार ७७० रुपये किमतीचा १२४.८९० किलो गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी वृत्त लिहिस्तोवर अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे तळेगाव पोलिसांनी सांगितले.