सात अधिकारी, ३९ कर्मचाऱ्यांना जडले मधुमेह, रक्तदाबासह विविध आजार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 11:26 AM2024-11-11T11:26:36+5:302024-11-11T11:28:17+5:30
Amravati : निवडणुकीच्या कामकाजापासून दूर राहण्यासाठी नव्या क्लृप्त्या
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी प्रत्येक विभागातील कर्मचारी आणि अधिकारी रात्रंदिवस मेहनत घेत असताना, या कामातून वगळण्यात यावे, म्हणून जिल्ह्यातील आठ विधानसभा क्षेत्रातील सात अधिकारी ३९ कर्मचाऱ्यांनी आपल्याला मधुमेह, तसेच रक्तदाबाचा आजार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर केले. या प्रकाराची चौकशी आगामी काळात होणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन व विधानसभा परिक्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी डोळ्यात तेल घालून एक महिन्यापासून काम करीत आहे. प्रत्येक क्षेत्रात आचारसंहिता पथक, तसेच विविध भरारी पथकांची स्थापना करण्यात आली. यात महसूल प्रशासन, पोलीस ठाणे, अप्पर वर्धा, पाटबंधारे विभाग व अन्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आपली या कामातून सुटका व्हावी, म्हणून अनेकांनी क्लुप्ती लढविली आहे. आपल्याला मधुमेह, रक्तदाब, असा आजार असल्याचे प्रमाणपत्र सादर केले आहे. या प्रमाणपत्राची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने संबंधित विभागाला दिले आहेत. हे प्रमाणपत्र बनावट आढळल्यास या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होणार आहे.
परजिल्ह्यातील वाहनांवर लक्ष
निवडणुकीच्या प्रचाराला गती आली आहे. मतदारसंघात कोणत्या उमेदवारांचे परवानगी घेतलेले चारचाकी वाहन कोणत्या परिसरात फिरत आहे, परवानगी न घेता मतदारसंघात काही वाहने फिरत असल्यास थेट वाहनचालकावर कारवाई करून पोलिस ठाण्यात ही गाडी लावण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहे. दुसऱ्या जिल्ह्यातील वाहनावर निगराणी ठेवण्याचे आदेश प्रशासनाने पोलिस विभागाला दिले आहेत.