शहरातील सात रस्ते पुन्हा फोडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 01:26 AM2019-06-06T01:26:17+5:302019-06-06T01:26:37+5:30
कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर झालेले रस्ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महावितरण, भुयारी गटार योजना व रिलायन्स यांनी त्यांच्या उपक्रमासाठी फोडलेत. दुरुस्तीचे तीनतेरा झाले असताना, आता शासनाच्या महानेट प्रकल्पासाठी शहरातील सात रस्ते २८३० मीटरपर्यंत फोडण्यात येणार असल्याने चांगल्या रस्त्यांची पुन्हा वाट लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर झालेले रस्ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महावितरण, भुयारी गटार योजना व रिलायन्स यांनी त्यांच्या उपक्रमासाठी फोडलेत. दुरुस्तीचे तीनतेरा झाले असताना, आता शासनाच्या महानेट प्रकल्पासाठी शहरातील सात रस्ते २८३० मीटरपर्यंत फोडण्यात येणार असल्याने चांगल्या रस्त्यांची पुन्हा वाट लागणार आहे.
कित्येक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर शहरातील रस्त्यांना आता कुठे चांगले दिवस आले असताना, पुन्हा दृष्ट लागली आहे. शहराचा विकास करायचा असेल, तर चांगल्या रस्त्यांची वाट लावणे हेच समीकरण अलीकडे अमरावतीच्या वाट्याला आहे. मागील चार वर्षांत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची अमृत योजना, महावितरणद्वारे भूमिगत केबल, रिलायन्स कंपनीचे फायबर आॅप्टिक केबल, भुयारी गटार योजना त्यांनी चांगल्या रस्त्यांचे तीनतेरा वाजविलेत. दुरुस्तीवर महापालिकेने कितपत लक्ष दिले, हा संशोधनाचा विषय आहे. नागरिकांना किमान रस्त्याची तरी सुविधा राहणार की नाही, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. या कामानंतर एकदाचा उसासा नागरिकांनी टाकला नाही तोच पुन्हा महानेट प्रकल्पाच्या फायबर आॅप्टिक केबलसाठी शहरातील सात रस्त्यांची वाट लागणार आहे.
जिल्हा मुख्यालय ग्रामीण विभागाला जोडण्यासाठी शासनाचा महत्त्वपूर्ण प्रकल्प असल्याचे सांगत आणि शासकीय अध्यादेशाचा आधार घेत महापालिकेने रस्ते फोडून फायबर आॅप्टिक केबल टाकण्यासाठी सामंजस्य करार करून टाकला. यामध्ये सभागृहाला विश्वासात घेतले गेले नाही. एमओयू कसा आहे, याची माहितीदेखील सभागृहासमोर नीटपणे सांगता आलेली नाही, असा आरोप मंगळवारच्या आमसभेत सदस्यांकडून झालेत. त्यामुळे विकासाच्या नावावर फोडण्यासाठी शहरातील चांगले रस्ते दानातच द्यायचे काय, हा प्रश्न निर्माण झाला आहे. असे जर होत असेल, तर फोडलेले रस्ते पूर्ववत करण्यासाठी महापालिका प्रशासन कितपत गंभीर आहे, याची प्रचिती अमरावतीकरांना या चार वर्षात आलेली आहे.
फोडलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे, असे शहर अभियंत्यांनी सभागृहाला सांगितले. विशेष म्हणजे, यावर सदस्यांनीच अविश्वास दाखविला. पूर्वानुभवदेखील तसाच आहे. यापूर्वी डांबरी व काँक्रीट रस्ते फोडल्यानंतर काँक्रीटने बुजविलेत. मात्र, ही बांधकामाची यंत्रणा नसल्यानेच मजुराद्वारे केवळ खड्ड्यांमध्ये काँक्रीट टाकण्याचा प्रकार झाला. त्यावर पाणी कधी टाकण्यातच आलेले नाही. त्यामुळे पुन्हा काँक्रीट उखडून ‘जैसे थे’ परिस्थिती झालेली आहे. याबाबत महापालिकेच्या कोणत्याही अभियंत्याने कधीही जाब विचारल्याचे ऐकीवात नाही.
महानेट प्रकल्पासाठी फोडण्यात येणाऱ्या रस्त्यांसाठी तरी महापालिकेने सजग राहून रस्ते पूर्ववत करणे महत्वाचे आहे, अशी भावना शहरवासीयांमध्ये व्याप्त आहे.
प्रशासन म्हणते, राज्य शासनाची मुभा
महानेट प्रकल्पासाठी राज्य शासनाने भूमिगत केबल टाकण्यासाठी परवानगी देण्यापासून सूट दिली असल्याचे शहर अभियंता रवींद्र पवार यांनी स्पष्ट केले. रस्ते खोदण्याच्या किंवा केबल टाकण्याच्या पाच दिवसाआधी पूर्व महापालिका प्रशासनाला सांगण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या अख्यतारीतील वन विभाग सोडता सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाना लागू असल्याचे जीआरमध्ये स्पष्ट केले असल्याची बाबदेखील शहर अभियंत्यांनी स्पष्ट केली. अमरावती शहरातील रस्ते फोडण्याचे काम स्टरलाईट टेक लि. ही कंपनी करणार आहे.मात्र, रस्ते पूर्ववत केले नाही, तर या कंपनीला कश्या प्रकारे दंडित करणार, ही बाब कुठे आलीच नाही.
या रस्त्यांवर होणार खोदकाम
तहसील कार्यालय ते पशुवैद्यकीय कार्यालयदरम्यान उजव्या बाजूने ७० मीटर
पशुवैद्यकीय कार्यालय ते सफील रोडच्या दरम्यान उजव्या बाजूचे १४० मीटर
सफील रोड ते टांगा पडाव चौकदरम्याचे अंतरात टाव्या बाजूला २२५ मीटर
पशुवैद्यकीय कार्यालय ते प्रभात टॉकीज चौकाचे उजव्या बाजूला ८० मीटर
प्रभात टॉकीज चौक ते चित्रा टॉकीज चौकादरम्यान उजव्या बाजूला ८० मीटर
इर्विन चौक ते गर्ल्स हायस्कूल दरम्यानचे उजव्या बाजूला १०७० मीटर
गर्ल्स हायस्कूल चौक ते बियाणी चौकाचे दरम्यान डाव्या बाजूला १०७५ मीटर