मेळघाटात तीन दिवसांत बांधणार सात हजार शौचालये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 11:32 AM2018-01-23T11:32:54+5:302018-01-23T11:33:27+5:30

मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींच्या तब्बल ९९ गावांमध्ये जिल्हा परिषदेचे दीडशेवर अधिकारी व दीड हजारांवर कर्मचारी तीन दिवसांत सात हजार शौचालयांच्या बांधकामासाठी झटणार आहेत.

Seven thousand toilets constructed in three days in Melghat | मेळघाटात तीन दिवसांत बांधणार सात हजार शौचालये

मेळघाटात तीन दिवसांत बांधणार सात हजार शौचालये

Next
ठळक मुद्देजि.प. करणार विक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींच्या तब्बल ९९ गावांमध्ये जिल्हा परिषदेचे दीडशेवर अधिकारी व दीड हजारांवर कर्मचारी तीन दिवसांत सात हजार शौचालयांच्या बांधकामासाठी झटणार आहेत. यासाठी सोमवारी परतवाडा विश्रामगृहातून संपूर्ण ताफ्याने मेळघाटकडे कूच केले.
मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रत्येक घरी शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे. नरेगा अंतर्गत ११५ ग्रामपंचायतींच्या तीनशेवर गावांमध्ये १२ हजार शौचालयाचे बांधकाम ३० डिसेंबर २०१७ ते २४ जानेवारी २०१८ या २५ दिवसांत पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला. पहिल्या टप्प्यात १५ जानेवारीपर्यंत साडेपाच हजार शौचालये बांधण्यात आली. उर्वरित सात हजार शौचालयांची कामे २२ ते २४ जानेवारी या तीन दिवसांत पूर्ण करण्याचे टार्गेट आहे. याचे नियोजन करून सोमवारी ९९ चमू तयार करण्यात आल्या आहेत. ‘ड्रीम मेळघाट - क्लीन मेळघाट’ हे घोषवाक्य असलेल्या विश्रामगृहानजीक लावलेल्या एका स्टॉलवरून साहित्य घेत अधिकारी-कर्मचाऱ्यांची वाहने मेळघाटात रवाना झाली.

विशेष पेहराव, टोपी-टी शर्ट
जिल्हा परिषदेने या संपूर्ण प्रकल्पासाठी विशेष तयारी केली आहे. टीममध्ये सहभागी सदस्यांना स्वच्छता अभियानाचा लोगो असलेले निळ्या रंगाचे टी-शर्ट आणि पांढरी कॅप देण्यात आली. सर्व सदस्यांनी एकदिलाने काम काम करावे, हा यामागील हेतू आहे.

२६ जानेवारीला अमरावती हागणदारीमुक्त
संपूर्ण देशात ऐतिहासिक असे उद्दिष्ट गाठण्याचा संकल्प जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी घेतला आहे. यात मेळघाटातील आदिवासींच्या दिमतीला धावले आहे. २६ जानेवारीपर्यंत अमरावती जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी दिवस-रात्र कामे सुरू आहेत.


तीन दिवसांत संकल्पपूर्तीसाठी जिल्हा परिषदेचे अधिकारी-कर्मचारी झटत आहेत. यातील काही कामे अपूर्ण राहिली, तर उर्वरीत ३१ जानेवारीपर्यंत कुठल्याही स्थितीत पूर्ण करू. यात स्थानिक आदिवासींचे सहकार्य मोठ्या प्रमाणात लाभले आहे.
- किरण कुलकर्णी, मुख्याधिकारी, जि.प., अमरावती.

Web Title: Seven thousand toilets constructed in three days in Melghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Melghatमेळघाट