अमरावती जिल्ह्यातील सात हजार गावे ढालपूजनासाठी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 12:13 PM2018-11-06T12:13:50+5:302018-11-06T12:15:55+5:30
आदिवासी गोवारी समाजाचा पारंपरिक उत्सव असलेल्या ढालपूजननासाठी सात हजार गावे सज्ज झाली असून, या गावांत रात्रीला पूर्वतयारीचा सराव करण्यात येत आहे.
मोहन राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आदिवासी गोवारी समाजाचा पारंपरिक उत्सव असलेल्या ढालपूजननासाठी सात हजार गावे सज्ज झाली असून, या गावांत रात्रीला पूर्वतयारीचा सराव करण्यात येत आहे.
गावातील लोकांची जनावरे चारून महिन्याकाठी मिळणाऱ्या ५० रुपयांच्या चराईवर आजही गोवारी समाज आपल्या कुटुंबाचे पालन-पोषण करतोय. पूर्व विदर्भात अधिक संख्येने असलेल्या या आदिवासी गोवारी समाजासाठी ढाल पूजन उत्सव अधिक महत्त्वाचा असतो. या उत्सवाची तयारी १५ दिवसपूर्वीच गावागावांत झली आहे. उत्सवात वाजविण्यासाठी लागणारी डफली तयार केली जात आहे. अंबाडीची झाडे आणून विविध साहित्य तयार करण्याचे काम सुरू आहे. ज्या गावात अंबाडी मिळत नसेल तिथे प्लास्टिक व त्यांच्या दोरीपासून साहित्य बनवली जात आहे. दिवसभर ही कामे होत असली तरी रात्रीला नृत्याचा सराव सुरू असतो.
दिवाळीच्या पाडव्याला उत्सव
दिवाळीच्या पाडव्याला होणाऱ्या उत्सवाच्या दिवशी जनावरांना लक्ष्मीसारखे सजविले जातात. सायंकाळी गावात गुरे गावातील मुख्य मार्गाने फिरवून फटाक्यांच्या आतषबाजीत प्रत्येक गाय हंबरण्याच्या वेळेपर्यंत नाचविण्याची परंपरा आहे. तत्पूर्वी दोन बाशांवर फडके म्हणजे पुरुष म्हणजे गोहळा तर स्त्री म्हणजे गोहळी उभारण्यात येते. दुपारी प्रथम सुताराच्या घरी या ढालीला पाणी पिण्यासाठी नेल्यानंतर खऱ्या अर्थाने आदिवासी गोवारी बांधव नृत्याला सुरुवात करते डफली व मुरलीच्या निनादात दादरे रंगल्याने नृत्यात अधिक रंगत येथे हा उत्सव दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गावागावांत साजरा करण्यात येतो. या उत्सवात प्रत्येक ग्रामस्थ सहभागी होतो. या उत्सवाला सव्वादोनशे वर्षांची परंपरा आहे. पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, वर्धा व गोंदिया जिल्ह्यात हा उत्सव सतत तीन दिवस चालतो.
शेकडो वर्षांची ढाल पूजनाची गोवारी समाजाची परंपरा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून हातावर आणून पानावर खाणारी ही जमात आजही अठराविश्वे दारिर्द्यात जगते सरकारने सकारात्मक पावले उचलून त्वरित उच्च न्यायालयाचे अंमलबजावणी करावी.
- शालिक नेवारे, समन्वयक राज्य समन्वयक आदिवासी गोवारी जमात समन्वय समिती नागपूर