कारंजा लाड येथे सातवे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 08:45 PM2018-02-21T20:45:44+5:302018-02-21T20:45:56+5:30
महाराष्ट्र राज्य शिक्षक साहित्य संघ व मासिक शिक्षकमत परिवार यांच्यावतीने सातवे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन कारंजा लाड येथे विद्याभारती महाविद्यालय परिसरातील माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील साहित्यनगरीत २४ व २५ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे.
अमरावती : महाराष्ट्र राज्य शिक्षक साहित्य संघ व मासिक शिक्षकमत परिवार यांच्यावतीने सातवे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन कारंजा लाड येथे विद्याभारती महाविद्यालय परिसरातील माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील साहित्यनगरीत २४ व २५ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे.
अमरावती येथील ज्येष्ठ साहित्यिक शोभा रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाºया दोन दिवसीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत आ.ह. साळुंके करतील. स्वागताध्यक्ष विद्याभारती महाविद्यालयाचे प्राचार्य पृथ्वीराजसिंह राजपूत आहेत. प्रमुख उपस्थितांमध्ये लोककवी विठ्ठल वाघ, ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत तिडके, उपविभागीय पोलीस अधीक्षक राजेश कावळे, प्राचार्य सुभाष गवई, पत्रकार विलास मराठे आदी उपस्थित राहणार आहेत. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडी निघेल. सकाळी १० वाजता उद्घाटन सोहळ्यात ‘शिक्षकमत’ विशेषांक तसेच कवी विष्णू सोळंके यांचे ‘देखणे हे दु:ख आहे’, विजय हरणे यांचे ‘शब्दवेल’, छाया पाथरे यांच्या ‘ओंजळ’ या काव्यसंग्रहाचे, पुष्पा अतकरे याच्या ‘देशप्रेम’ व ‘देणं’ या एकांकिकांचे तसेच कल्पना उल्हे यांच्या ‘ती’चे विश्व’ या वैचारिक लेखसंग्रहाचे प्रकाशन व गुणवंतांचा गौरव करण्यात येणार आहे. तिसºया सत्रात १ ते ३ या वेळेत ‘स्त्री शिक्षण व सद्यस्थिती’ या विषयावर परिसंवाद होईल. चौथ्या सत्रात पुरुषोत्तम बोरकर यांची प्रकट मुलाखत, पाचव्या सत्रात दुपारी ४ ते ६ विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सहाव्या सत्रात रात्री ८ वाजता विठ्ठल वाघ यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे.
२५ फेब्रुवारी रोजी सातव्या सत्रात सकाळी ९ वाजता कथाकथन, आठव्या सत्रात दुपारी १२ वाजता ‘मराठी भाषेचे संवर्धन व संगोपन आवश्यक’ या विषयावर परिसंवाद, नवव्या सत्रात दुपारी २ वाजता नागपूरच्या विजया मारोतकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘काव्यधारा’ कविसंमेलन व शेवटच्या सत्रात दुपारी ४ वाजता समारोपीय समारंभ, खुले अधिवेशन, मान्यवरांचे सत्कार आणि पुरस्कार वितरण आयोजित करण्यात आले आहे.