चिखलदऱ्यात पाच वर्षात पाऊणशे पर्यटकांचे अपघाती निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 04:33 PM2019-08-01T16:33:03+5:302019-08-01T16:36:21+5:30

विदर्भाचे एकमेव पर्यटनस्थळ चिखलदरा येथे अलीकडच्या काळात विविध पॉइंटवर आत्महत्या आणि अपघातात पर्यटकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. मागील पाच वर्षांत ५० पर्यटकांनी आत्महत्या केल्या, तर जवळपास ७५ अपघाती मृत्यू झाले.

Seventy-five tourists died in accident in Chikhaldara Paradise in five years | चिखलदऱ्यात पाच वर्षात पाऊणशे पर्यटकांचे अपघाती निधन

चिखलदऱ्यात पाच वर्षात पाऊणशे पर्यटकांचे अपघाती निधन

googlenewsNext
ठळक मुद्देआत्महत्येची पन्नाशी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले सुरक्षेचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
नरेंद्र जावरे
अमरावती : विदर्भाचे एकमेव पर्यटनस्थळ चिखलदरा येथे अलीकडच्या काळात विविध पॉइंटवर आत्महत्या आणि अपघातात पर्यटकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. मागील पाच वर्षांत ५० पर्यटकांनी आत्महत्या केल्या, तर जवळपास ७५ अपघाती मृत्यू झाले. एकट्या भीमकुंड पॉइंटवरून २० जणांनी उडी घेऊन जीवन संपविले. त्यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपालिकेला सुरक्षा रक्षकांना तैनात करण्याचे आणि सूचनाफलक लावण्याचे आदेश दिले.
समुद्र सपाटीपासून ३६०० फूट उंचावर असलेले चिखलदरा पर्यटनस्थळ संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या पर्यटनस्थळाला मध्यप्रदेश, दिल्ली, राजस्थान, गुजरात आदी राज्यांतील पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. आॅगस्ट ते फेब्रुवारी या काळात चिखलदरा पर्यटनस्थळ हिरवेगार असल्याने या काळात पर्यटकांची संख्या सर्वाधिक राहते. गगनचुंबी उंच पहाडावर धो-धो कोसळणाºया धबधब्यांचा मनमोहन नजारा, आल्हाददायक वातावरण येणाऱ्या पर्यटकांना मोहित करणारे ठरते. परिवार आणि मित्रमंडळासोबत आलेले पर्यटक संपूर्ण चिखलदरा पालथा घालतात. दुसरीकडे कौटुंबिक वाद किंवा इतर समस्यांनी ग्रासलेल्यांनी येथील उंच कड्यांवरून स्वत:ला झोकून देऊन आत्महत्या केल्याचा प्रकार बरेचदा उघडकीस आला आहे. काहींनी जंगलात झाडांना गळफास घेऊन तसेच विष प्राशूनसुद्धा आत्महत्या केली. भीमकुंड दरी आणि डोह, सक्कर तलाव, पंचबोल पॉइंट, गाविलगड किल्ल्यातील मच्छी तलाव, पारस तलावात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत.

सर्व पॉइंट व्याघ्र प्रकल्पाच्या अखत्यारीत
पूर्वी चिखलदरा नगरपरिषदेच्या अखत्यारीत असलेले सर्व पॉइंट नंतर वनविभाग व आता मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अखत्यारीत आले आहेत. पूर्वीपासूनच या पॉइंटवर दरीच्या काठावर लोखंडी सुरक्षा कठडे आहेत. तथापि, धोकादायक असलेल्या या पॉइंटवर फलक बेपत्ता आहेत, सुरक्षा गार्ड नाहीत. पावसाळा सुरू होताच भीमकुंड, पंचबोल, देवी पॉइंट, गाविलगड, गोराघाट पॉइंट, जत्राडोह येथे पर्यटक गर्दी करीत आहेत. यामुळे तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी चिखलदरा नगरपालिकेला एका पत्राद्वारे दिले.

कुठे गेली वनव्यवस्थापन समिती?
धोकादायक पॉइंटवर वनविभागाच्यावतीने एक वनरक्षक, एक सुरक्षा रक्षक शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशी तैनात करण्यात येत होते. मात्र, तेही दिसेनासे झाले आहेत. व्याघ्र प्रकल्प अंतर्गत असलेल्या या पॉइंटची संपूर्ण जबाबदारी ग्राम विकास समिती व संयुक्त वनव्यवस्थापन समितीवर आहे. त्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधीसुद्धा दिला जातो. तथापि, त्या निधीतही वनकर्मचाऱ्यांनी अध्यक्षांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात घोळ केला. परिणामी समितीचे सदस्य येत नसल्याची माहिती आहे

भीमकुंड, पंचबोलवर सर्वाधिक आत्महत्या
भीमाने कीचकाचा वध केल्यानंतर रक्ताने माखलेले हात ज्या कुंडात धुतले, त्या कुंडाला भीमकुंड असे नाव आहे. एका आवाजाला प्रतिसाद देणारा पंचबोल पॉइंट व इतरही पॉइंटचे अंतर शहरापासून दोन ते पाच किलोमीटर आहे. पॉइंटवर सुट्टीचे दिवस वगळता वर्दळ राहत नाही. या निवांतपणाची संधी साधून भीमकुंड पॉइंटच्या दरीत किमान २०, पंचबोलच्या दरीत १०, इतर ठिकाणी जवळपास ५० पर्यटकांनी आत्महत्या, तर अपघाताने ७५ च्या जवळपास पर्यटकांनी जीव गमावला.

पर्यटनस्थळावरील विविध पॉइंटवर शनिवार-रविवारसह सुटीच्या दिवशी सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. सेल्फी फोटो घेताना खबरदार करणारे सुरक्षा फलक लावण्यात आले आहेत. सर्वच पॉइंटवर लोखंडी कठडे आहेत.
सूर्यकांत पिदुरकर, मुख्याधिकारी, नगर परिषद, चिखलदरा

Web Title: Seventy-five tourists died in accident in Chikhaldara Paradise in five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.