आठ कोटींच्या पाणीटंचाई आराखड्यावर शिक्कामोर्तब
By admin | Published: January 25, 2017 12:10 AM2017-01-25T00:10:45+5:302017-01-25T00:10:45+5:30
यंदाच्या उन्हाळयातही जिल्ह्यातील काही तालुक्यांना पाणीटंचाईची झळ बसण्याची शक्यता लक्षात घेता...
जिल्हा परिषद : जिल्हाधिकाऱ्यांची हिरवी झेंडी, सातशे गावांत ७३७ पाणीटंचाई उपाययोजना
अमरावती : यंदाच्या उन्हाळयातही जिल्ह्यातील काही तालुक्यांना पाणीटंचाईची झळ बसण्याची शक्यता लक्षात घेता जि.प.च्या पाणीपुरवठा विभागाने सुमारे ८ कोटी रूपयांचा कृती आराखडा तयार केला असून याआराखडयास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे.
जि.प.च्या पाणीपुरवठा विभागाने यंदाच्या पाणीटंचाईच्या संभाव्य कृती आराखड्यात जिल्ह्यात ७०० गावांमध्ये ७३७ पाणीटंचाईच्या उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. यासाठी जवळपास ८ कोटी ७८ लाख ५६ हजार रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. दरवर्षी आॅक्टोबर ते डिसेंबर २०१६ या कालावधीत पाणीटंचाईच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात कुठेही पाण्याची समस्या निर्माण झाली नाही. दुसऱ्या टप्प्यात जानेवारी ते मार्च २०१७ या कालावधीत जिल्ह्यातील ४३६ गावे व वाडयांमध्ये मागणीनुसार उपाययोजना प्रस्तावित आहेत. पाणीटंचाईच्या तिसऱ्या टप्प्यातील एप्रिल ते जून २०१७ याकालावधीत काही गावांत तीव्र पाणीटंचाईची शक्यता आहे. त्यामुळे जि.प.पाणीपुरवठा विभागाने २६४ गावांत पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना केली आहे. संभाव्य कृती आराखडयात नवीन विंधन विहिरी १९७, नळयोजनांची विशेष दुरूस्ती १४२, तात्पुरत्या पूरक नळयोजना ४०, टँकर अथवा बैलजोडीने पाणीपुरवठा करणे १५ गावे, विहिरींचे अधिग्रहण १९० यासोबतच वेळेवर उद्भवणाऱ्या परीस्थितीनुसार विहिंरीचे खोलीकरण, गाळ काढणे, विंधन विहिरींची दुरूस्ती आदी उपाययोजना करण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने संभाव्य पाणीटंचाईचा कृ ती आराखडा तयार केला आहे. सुमारे ८ कोटी ७८ लाख ५६ हजार रूपयाच्या या आराखडयास जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी हिरवी झेंडी दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनुसार पाणीटंचाई आराखडयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. यामुळे पाणीेटंचाईच्या उपाययोजनांना गती येईल. तसेच कोणत्याही तालुक्यात तीव्र पाणीटंचाईची स्थिती उत्पन्न होणार नाही. (प्रतिनिधी)
यंदा आराखड्याची रक्कम घटली
जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने मागील वर्षी सुमारे १० कोटी रूपयांचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला होता.मात्र, यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने संभाव्य पाणीटंचाई आराखडयाची रक्कम ८ कोटी ७८ लाख ५६ हजार रूपये इतकी आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत साधारणपणे १ कोटी रूपयांनी आराखडयाचे नियोजन घटले आहे.
टँकर्सची संख्या वाढण्याची शक्यता
दरवर्षी मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील १५ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, यंदा कमी झालेला पाऊस लक्षात घेता टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी गावांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.