रेल्वे प्रशासनाला नाही कोरोना संसर्गाचे गांभीर्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 05:00 AM2021-02-17T05:00:00+5:302021-02-17T05:00:52+5:30
बडनेरा रेल्वे स्थानक जिल्ह्यात वर्दळीचे व जंक्शन म्हणून परिचित आहे. येथून मोठा प्रवासी वर्ग ये-जा करीत असतो. अमरावती जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये काही दिवसांत प्रचंड वाढ झाली आहे. संसर्ग प्रवाशांदरम्यान पसरू शकतो. एका रेल्वेगाडीत शेकडो प्रवासी असतात. देशाच्या कानाकोपऱ्यातून ते प्रवास करीत असतात. त्यांच्यातही कोरोनाबाबत औदासीन्य असून, बहुतेक जण मास्क लावत नसल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : सध्या कोरोना रुग्णांमध्ये जिल्ह्यात प्रचंड वाढ झाली आहे. अशातच रेल्वे प्रवाशांमध्ये मास्कचा अभाव, रेल्वे स्थानकावर थर्मल स्क्रीनिंगच्या अनियमिततेमुळे संसर्ग पसरू शकतो, हे नाकारता येणार नाही. रेल्वे प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेणे तेवढेच गरजेचे झाले आहे.
बडनेरा रेल्वे स्थानक जिल्ह्यात वर्दळीचे व जंक्शन म्हणून परिचित आहे. येथून मोठा प्रवासी वर्ग ये-जा करीत असतो. अमरावती जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये काही दिवसांत प्रचंड वाढ झाली आहे. संसर्ग प्रवाशांदरम्यान पसरू शकतो. एका रेल्वेगाडीत शेकडो प्रवासी असतात. देशाच्या कानाकोपऱ्यातून ते प्रवास करीत असतात. त्यांच्यातही कोरोनाबाबत औदासीन्य असून, बहुतेक जण मास्क लावत नसल्याचे चित्र आहे.
रेल्वे प्रवाशांमधून कोरोनाचा संसर्ग पसरू नये, यासाठी जनरल डब्यांमध्येदेखील आरक्षित तिकिटाचे नियोजन रेल्वे प्रशासनाने आखले आहे. रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी होऊ नये, हादेखील त्यामागचा हेतू आहे. यामुळे गर्दी टळली तरी असले तरी मात्र बहुतांश प्रवासी मास्क न लावताच प्रवास करीत असल्याचे समोर येत आहे.
बडनेरा रेल्वे स्थानकावर प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग नियमित होत नसल्याची ओरड नियम पाळणाऱ्या प्रवाशांमध्ये आहे. काही रेल्वेगाड्यांच्या प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग होते, तर काही गाड्यांमध्ये ही सुविधा नाही.
महाराष्ट्र एक्स्प्रेस १६ फेब्रुवारी रोजी दाखल झाली तेव्हा बडनेरा रेल्वे स्थानकावर व बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग झाली नाही. असेच कामकाज सुरू राहिल्यास संसर्ग वाढण्यास रेल्वे स्थानकाची नक्कीच भर पडेल.
रेल्वे स्थानकावर नियमित स्क्रीनिंग होणे अत्यंत गरजेचे आहे. कारण आता रेल्वे गाड्या व प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. प्रवाशांकडून मास्कचा वापर, रेल्वे स्थानकावर प्रत्येक प्रवाशाचे थर्मल स्क्रीनिंग याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे तसेच प्रवाशांनी दक्ष राहणे गरजेचे आहे.