नाल्या तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:12 AM2020-12-06T04:12:18+5:302020-12-06T04:12:18+5:30
पान २ चे बॉटम ग्रामपंचायत अस्वच्छतेकडे लक्ष देईल का? अनियमित साफसफाईमुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आसेगाव पूर्णा : अचलपूर पंचायत ...
पान २ चे बॉटम
ग्रामपंचायत अस्वच्छतेकडे लक्ष देईल का? अनियमित साफसफाईमुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात
आसेगाव पूर्णा : अचलपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या खैरी-दोनोडा येथील ग्रामपंचायत प्रशासनातर्फे गावपरिसरात स्वच्छता होत नसल्याने गावांतील सांडपाणी वाहणाऱ्या नाल्या तुंबल्या असून, नाल्यातील सांडपाणी रस्त्यावरून वाहून रस्त्यावर डबकी साचली आहे. परिणामी, मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव झाला असून, आरोग्य धोक्यात आले असल्याची खंत खैरी-दोनोडा गावातील ग्रामस्थांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
खैरी-दोनोडा येथील मुख्य रस्त्यावरील चौकातील सांडपाणी वाहणाऱ्या नाल्या कचरा व प्लास्टिकने तुंबल्या. तर शेजारी झाडेझुडपे वाढली आहेत. यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढल्याने परिसरातील नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. बऱ्याच दिवसांपासून नाल्यांचा उपसा केला नसल्याने त्यातून घाणेरडे पाणी रस्त्यावर येत आहे. सध्या कोरोनाचे सावट असताना, मच्छरांमुळे डेंग्यू, मलेरियासारखे साथीचे आजार पसरण्याची भीती येथील रहिवाशांकडून व्यक्त करण्यात येते. जंतुनाशक औषधांची फवारणी करणे गरजेचे असतांना स्थानिक ग्रामपंचायततर्फे कुठल्याही उपाययोजना करण्यात येत नसल्याचे रहिवाशांनी सांगितले. गावाच्या स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतीला शासनाकडून लाखो रुपयांचा निधी मिळतो. मात्र, त्यानंतरही अस्वच्छता कायम असल्याने रोष व्यक्त होत आहे.
टाकी परिसरात घाणीचे साम्राज्य
दोनोडा येथील पिण्याच्या टाकी परिसरातील ज्या बोअरवेद्वारे गावाला पिण्याचे पाणीपुरवठा केला जातो, त्या टाकी परिसरातील हॉलजवळ घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गावातील काही नागरिकांनी त्या परिसरात अतिक्रमण केले आहे. परिसर अस्वच्छ असून, त्या ठिकाणावरूनच गावात पिण्याचा पाणीपुरवठा केला जातो. यामुळे भविष्यात एखादी दुर्घटना घडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
ग्रामपंचायतच जबाबदार
खैरी-दोनोडा येथील गावात समस्यांचा डोंगरच असून, या समस्यांना स्थानिक प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक नागरिक दत्ता कुकडे, मनोज ऊतखडे, राहुल वैराळे, स्वप्निल झोड, अंकुश अमझरे, रतन नांदने, योगेश गायकवाड यांनी केला आहे. आता याबाबत आम्ही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटू, असा दम ग्रामस्थांनी भरला आहे.
------------