अपंग तरुणाचे लैंगिक शोषण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 12:03 AM2018-01-16T00:03:00+5:302018-01-16T00:03:25+5:30
एका ७० वर्षीय वृद्धाने अपंग तरुणाचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाने रविवारी रात्री शहरात खळबळ उडाली.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : एका ७० वर्षीय वृद्धाने अपंग तरुणाचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाने रविवारी रात्री शहरात खळबळ उडाली. दोन समुदाय कोतवाली पोलीस ठाण्यात आमने-सामने आल्यानंतर तणावसदृश स्थिती निर्माण झाली होती. मात्र, तपोवन परिसरात घटना घडल्याचे कळताच कोतवाली पोलिसांनी तक्रारकर्ता व आरोपीला गाडगेनगर पोलिसांच्या स्वाधीन केले.
सोमवारी सकाळी हे प्रकरण पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्यासमक्ष ठेवण्यात आले. मात्र, पीडित तरुणाने दिलेल्या बयाणात असे काही घडलेच नसल्याची बाब समोर आली. या गंभीर आरोपाच्या प्रकरणात कसून चौकशी सुरू आहे.
पायाने अपंग असलेला एक २० वर्षीय तरुण आठ दिवसांपूर्वी तपोवन येथील आश्रमात काही कामानिमित्त गेला होता. दरम्यान त्या तरुणाची ओळख एका ७० वर्षीय वृद्धासोबत झाली. दरम्यान त्या वृद्धाने त्या तरुणाजवळील महत्त्वाचे दस्तऐवज जवळच ठेवून घेतले आणि ब्लॅकमेल करून तपोवनजवळील एका ठिकाणी त्या तरुणाला नेऊन लैंगिक शोषण केल्याचे तो तरुण पोलिसांना सांगत होता. रविवारी रात्री त्या तरुणाने घटनेचे कथन कोतवाली पोलिसांसमोर केले होते. त्यामुळे कोतवाली ठाण्यात दोन समाजातील नागरिकांची गर्दी जमली होती. या प्रकरणामुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे ठाणेदार दिलीप पाटील यांनी संबंधित प्रकरणातील घटनास्थळाची शहानिशा केली. तेव्हा ही घटना गाडगेनगर हद्दीतील तपोवन परिसरात घडल्याचे त्या तरुणाने पोलिसांना सांगितले. त्यामुळे हे प्रकरण गाडगेनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. घटनेची गंभीरता पाहता पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले होते. हे प्रकरण पोलीस उपायुक्त चिन्मय पंडीत यांच्यासमक्ष ठेवण्यात आल्यावर त्यांनी त्या तरुणाचे व आरोपींसह त्यांच्या नातेवाईकांचे बयाण नोंदविले. मात्र, या बयाणामध्ये त्या तरुणावर लैंगिक शोषण झालेच नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण चौकशीत ठेवले असून त्यातील तत्थे शोधण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.
लैंगिक शोषण झाले नसल्याचे बयाण त्या तरुणाने दिले आहे. त्यामुळे अद्यापपर्यंत कारवाई करण्यात आली नाही. मात्र, या प्रकरणाची चौकशी सुरू असून काही तथ्य आढळल्यास गुन्हे नोंदविण्यात येईल.
- चिन्मय पंडित,
पोलीस उपायुक्त