अमरावती जिल्ह्यात जिवाचा धाक घालून युवतीचे लैंगिक शोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 10:53 AM2018-10-17T10:53:31+5:302018-10-17T10:53:53+5:30
अचलपूर नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक शोषण केल्याची फिर्याद पीडितेने मंगळवारी दुपारी पोलिसांत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पोलीस कर्मचारी असलेल्या वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाचा उदरनिर्वाह व स्वत:च्या शिक्षणासाठी कारंजा घाडगे येथून परतवाड्याला आलेल्या युवतीला सतत तीन वर्षांपासून जिवे मारण्याची धमकी देत अचलपूर नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक शोषण केल्याची फिर्याद पीडितेने मंगळवारी दुपारी पोलिसांत दिली. या प्रकरणाने जुळ्या शहरांत एकच खळबळ उडाली. नरेंद्र रतन तांबे (३८) असे नराधमाचे नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथील सदर २६ वर्षीय युवती तीन वर्षांपूर्वी परतवाडा शहरात एका खासगी कॉन्व्हेंटमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होती. यादरम्यान माजी नगरसेवकपुत्र तसेच भाजपच्या नगरसेविकेचा दीर, सफाई कर्मचारी नरेंद्र तांबे याची नजर तिच्यावर गेली. तो तिचा सतत पाठलाग करीत असे. एक दिवस त्याने स्वत:चा मोबाईल नंबर तिला दिला. सेमाडोह जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. यानंतर आपल्याकडे चित्रफीत असल्याचे धमकावित तीन वर्षांपासून तो सतत अत्याचार करीत असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट युवतीने पत्रपरिषदेत केला. यानंतर तिने थेट परतवाडा पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली.
सदर प्रकार कुणाला सांगितला किंवा पोलिसांत गेल्यास भावाला जिवे मारण्याची धमकी मिळत असल्याने मी गप्प राहिले. मात्र, त्रास असह्य झाल्याने पत्रकार व पोलिसांपुढे जाण्याचा मार्ग निवडल्याचे तिने सांगितले.
पीडितेचे वडील नागपूर येथे पोलीस कर्मचारी होते. दहा वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचे कुटुंब कारंजा घाडगे येथे स्थायिक झाले. आई, तीन बहिणी, भाऊ असे हे कुटुंब आहे.
पीडित युवतीच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३७६, ३२३, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
संजय सोळके, ठाणेदार, परतवाडा
आईला मारहाण
मोबाईलवर किंवा प्रत्यक्षात कुणाही सोबत बोलले असता, तांबे त्यांना धमकावतो, मारहाण करतो व ही माझी तिसरी पत्नी असल्याचे सांगत अब्रूचे धिंडवडे काढतो आहे. माझ्या आईलादेखील त्याने मारहाण केली. आपले लग्न होऊ नये, यासाठी तो समाजातही बदनामी करीत असून, आपल्या जीवाला धोका असल्याचे पीडित युवतीने सांगितले.
करियर संपवले
खासगी कॉन्व्हेंटमधील नोकरी सुटल्यानंतर युवतीने मिल कॉलनीत एमपीएससीचे क्लासेस घेण्यासाठी किरायाने खोली घेतली. तेथे येऊन तांबे दररोज अत्याचार, मारहाण करतो व धमक्या देतो. परतवाडा शहरातील जयस्तंभ चौकातील बालाजी नामक एका लॉजमध्ये त्याने तीन वेळा अत्याचार केला, तर दोन वेळा गोळ्या देऊन गर्भपात केला, असे तरुणीने सांगितले.
कुणाची फसवणूक होऊ नये
तांबेच्या पूर्वीच्या दोन पत्नी असून, तो युवतींना फसवून त्यांचे शारीरिक शोषण करतो. आपल्याप्रमाणे अन्य मुलगी त्याच्या जाळ्यात फसू नये, यासाठी आपल्यावरील अत्याचार सार्वजनिक करीत असल्याचे युवतीने स्पष्ट केले. पत्रपरिषदेनंतर युवतीने थेट पोलीस ठाणे गाठल्याने पोलिसांच्या भुवया उंचावल्या होत्या. यापूर्वीही नरेंद्र तांबेच्या तावडीतून एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आल्याची चर्चा आहे.