अमरावती जिल्ह्यात अल्पवयीन विद्यार्थ्याशी लैंगिक चाळे ; प्राध्यापिकेला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 10:42 AM2018-03-29T10:42:49+5:302018-03-29T10:43:01+5:30
येथील सैनिक शाळेतील एका प्राध्यापिकेने अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत तीन महिनेपर्यंत अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला. मंगळवारी विद्यार्थ्याने पोलिसात तक्रार दिल्यावर प्राध्यापिकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथील सैनिक शाळेतील एका प्राध्यापिकेने अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत तीन महिनेपर्यंत अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला. मंगळवारी विद्यार्थ्याने पोलिसात तक्रार दिल्यावर प्राध्यापिकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली.
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथील सैनिक शाळेतील एका ४६ वर्षीय प्राध्यापिकेने इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्याचा लैंगिक छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चिखलदरा पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार कलम १० पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला.
या तक्रारीत ७ डिसेंबर २०१७ ते ९ मार्च २०१८ पर्यंतचा घटनाक्रम नमूद आहे. सन १९९१ ला सुरू झालेल्या या शाळेने नामवंत विद्यार्थी घडविले आहेत. विद्यार्थ्याने त्याच्यासोबत होत असलेला लैंगिक छळ वर्ग शिक्षक, प्राचार्यांसमोर कथन केला. त्यांनी तत्काळ संस्थाचालक आणि संचालकांना या गंभीर घटनेची माहिती दिली. त्यानंतर घटनेची सत्यता पडताळण्यात आली. त्यानंतर पोलिसात तक्रार देण्याचे विद्यार्थ्याला सुचविण्यात आले.
मंगळवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी विद्यार्थ्याचे बयाण घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी चिखलदऱ्याचे ठाणेदार के. बी. ठाकरेसह प्रदीप निंबाळकर, प्रशांत देशमुख आदी पुढील तपास करीत आहे.
या सैनिक शाळेतील विद्यार्थ्याच्या बयाणावरून तक्रार घेण्यात आली. सदर प्राध्यापिकेला अटक करण्यात आली असून, पुढील चौकशी सुरू आहे.
- के.बी.ठाकरे, ठाणेदार चिखलदरा
विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून प्राध्यापिका आणि विद्यार्थ्याची संस्थाध्यक्ष, संचालक व नेमलेल्या समितीनेही याची चौकशी केली. यात सत्यता आढळून आल्याने पोलिसात तक्रार दिली.
-अनिल प्रांजळे, प्राचार्य, सैनिक स्कूल