शून्य सावली आज अनुभवता येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 10:22 PM2018-05-24T22:22:01+5:302018-05-24T22:22:11+5:30
आयुष्यात सगळ्यांनी जरी साथ सोडली तरी माणसाच्या नेहमी सोबत असणारी त्याची सावली ही साथ सोडत नसते. मात्र, उत्तरायण आणि दक्षिणायनाच्या प्रवासामधील दोन दिवस सूर्य पृथ्वीच्या थेट मध्यावर अर्थात डोक्यावर येतो.
अमरावती : आयुष्यात सगळ्यांनी जरी साथ सोडली तरी माणसाच्या नेहमी सोबत असणारी त्याची सावली ही साथ सोडत नसते. मात्र, उत्तरायण आणि दक्षिणायनाच्या प्रवासामधील दोन दिवस सूर्य पृथ्वीच्या थेट मध्यावर अर्थात डोक्यावर येतो. सूर्यकिरणे डोक्यावर पडत असल्यामुळे प्रत्येक वस्तूची सावली ही पायाजवळ पडते वा अदृश्यही होते. अमरावतीकरांना असाच काहीसा अनुभव शुक्रवार, २५ मे रोजी दुपारी १२.३० वाजता ५२ सेकंदांसाठी येईल. झीरो शॅडो डेच्या कुतूहल असल्याने शहरवासीयांसाठी शुक्रवार हा वैशिष्ट्यपूूर्ण ठरणार आहे.
कर्कवृत्त आणि मकर वृत्त या दोन वृत्तांमध्ये राहणाऱ्या लोकांना वर्षातून दोन वेळेला शू्न्य सावलीचा अनुभव घेता येतो. कर्कवृत्त, मकर वृत्त आणि विषुववृत्त या वृत्तावर वर्षातून एकदाच शून्य सावलीचा अनुभव घेता येतो. कर्कवृत्ताच्या वरच्या भागात व मकर वृत्ताच्या खालच्या भागात राहणाºया लोकांना मात्र या शून्य सावलीचा आनंद घेता येत नाही.
पृथ्वी ही कर्कवृत्तावरून बरोबर तीन महिन्यांनी वसंत संपात बिंदूपाशी येते. या दिवशी १२ तासांची रात्र आणि १२ तासांचा दिवस असतो, तर सूर्याची किरणे विषुववृत्तावरती वरून पडतात. यामुळे विषुववृत्तावर कुठेही आपण उभे राहिलो तरी काही काळासाठी आपली सावली गायब होते. यानंतर बरोबर तीन महिन्यानंतर मकर वृत्तावर, तीन महिन्यांनी विषुववृत्तावर आणि नंतर पुन्हा तीन महिन्यानंतर कर्कवृत्तावर शून्य सावलीचा आनंद घेता येणार आहे. जेव्हा सूर्य बरोबर डोक्यावर असतो तेव्हा आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते आणि जणू काही ती गायब होते. मरेपर्यंत सोबतीला असलेली सावली ही अचानक ‘शून्य सावली’ झाल्याचा रोमांच जरूर अनुभवावा, असे आवाहन खगोलतज्ज्ञांनी केले आहे.