'सावली'साठी त्या वृद्धाची पायपीट !
By admin | Published: March 7, 2016 12:04 AM2016-03-07T00:04:55+5:302016-03-07T00:04:55+5:30
पायाचे दुखणे घेऊन जीवनाचा गाडा चालविणारा तो वृध्द सावलीच्या शोधात रस्ता ओलांडून दुभाजकावरील वृक्षाचा आसरा घेतो.
परिचर्या वसतिगृहासमोरील प्रकार : कुटुंबाने नाकारले, समाजाने झिडकारले, मग जायचे कुठे ?
अमरावती : पायाचे दुखणे घेऊन जीवनाचा गाडा चालविणारा तो वृध्द सावलीच्या शोधात रस्ता ओलांडून दुभाजकावरील वृक्षाचा आसरा घेतो. सायंकाळी उतरते ऊन्ह अंगावर पडताच पुन्हा रस्ता ओलाडून फुटपाथवर जातो, अशी ही त्या वृद्धाची पायपीट दररोजच सुरू असते.
इर्विन चौकातील परिचर्या वसतिगृहासमोर हा प्रकार ये-जा करणाऱ्यांना पहायला मिळत आहे. मात्र, आजपर्यंत त्या वृध्दाला आधार देण्याकरिता प्रशासन किंवा सामाजिक संघटना सरसावल्या नाहीत, ही शोकांतिका अमरावती शहरात पाहायला मिळत आहे.
पाच वर्षांपासून इर्विन चौकातच भीक मागणारे राजाराम वसंत बोपशेट्टी (६०) हे बुधवारा परिसरात राहत होते. आई-वडिलांच्या छत्रछायेत जगत असताना राजाराम हे घराच्या आवारात पाय घसरून पडले. त्यांच्या कंबरेचे हाड मोडले, तेव्हापासून त्यांच्या जीवन संकटमय झाले. कंबरेचा हाड मोडले होते. मात्र, परिस्थिती गरीब असल्यामुळे त्यांनी इर्विनमध्ये उपचार सुरू केले. मात्र, कंबरेच्या दुखण्यातून त्यांना अखेर कायमचे अपंगत्व आले. त्यातच आई-वडील वारल्यानंतर दु:खांचे दिवस सुरू झाले. तुटक्या घरात राहणार तरी किती दिवस, असा विचार करून राजाराम यांनी पाच वर्षांपूर्वी भीक मागणे सुरू केले. त्यासाठी इर्विन चौक हा वर्दळीचे ठिकाण त्यांनी निवडले. इर्विन चौकातील अन्नकुटावर जीवनाचा प्रवास सुरू केला.
जेवण मिळाले मात्र, छत नाही, छत नाही तर सावली कशी मिळणार, अशी स्थिती राजाराम यांच्यासमोर निर्माण झाली. मात्र, त्याचाही जालीम उपाय त्यांनी शोधला. सकाळी ऊन्ह पडल्यावर दुभाजकावरील वृक्षांची सावली रस्त्यावर पडते. त्यामुळे राजाराम हे पाय घासत हाताच्या साह्याने रस्ता ओलांडून दुभाजकाजवळ जातात, तेथील वृक्षांच्या सावलीत बसतात किंवा कधीकाळी झोपतातदेखील. मात्र, सायंकाळी मावळत्या सूर्याची किरणे अंगावर पडताच पुन्हा रस्ता पाय घासत हाताच्या बळावर पुन्हा रस्ता ओलांडून परिचर्या वसतिगृहासमोरील फुटपाथवर येतात.
दरम्यान, त्यांचे जेवण आणून देण्यासाठी एक महिला वृध्द भिकारीसुध्दा सोबतीला असते. ती वृध्दा जालना येथील असल्याचे सांगत असून ती आपले नाव मीरा महाजन सांगते. राजाराम व मीरा हे दोघेही संगतीने जेवणसुध्दा करतात. (प्रतिनिधी)
या निराधार वृद्धांची जबाबदारी कुणाची ?
अमरावतीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असताना निराधारांना आधार देणार कोणी नाही. प्रशासन विकास कामासाठी कोट्यवधी रुपये खर्च करतात, त्यातच सामाजिक दायित्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या संस्था विविध उपक्रमांद्वारे निराधारांचे पुनर्वसनसुध्दा करतात. मात्र, शहरात विविध ठिकाणी भीक मागणाऱ्या निराधार वृध्दाकडे कोणी का लक्ष पुरवित नाही, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.