वृक्षतोडीमुळे हरवली रस्त्यावरील सावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 11:01 PM2018-05-07T23:01:51+5:302018-05-07T23:02:08+5:30
स्थानिक कठोरा नाका ते नवसारी बायापास तसेच परतवाडा ते अंजनगाव सुर्जी या मार्गातील प्रवासी उन्हाच्या झळांपासून क्षणभर विश्रांतीसाठी झाडांचा गारवा शोधू लागले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्थानिक कठोरा नाका ते नवसारी बायापास तसेच परतवाडा ते अंजनगाव सुर्जी या मार्गातील प्रवासी उन्हाच्या झळांपासून क्षणभर विश्रांतीसाठी झाडांचा गारवा शोधू लागले आहेत. मात्र, गारव्यासाठी झाडेच नसल्याचे चित्र सध्या या मार्गावर आहे.
कठोरा नाका ते नवसारी बायपास, परतवाडा ते अंजनगाव सुर्जी या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी रस्त्याच्या कडेला दिमाखात उभी असलेली लहान-मोठी शेकडो झाडे कापण्यात आली. रस्त्यालगतची मोठी झाडे संपुष्टात आल्याने विश्रांतीसाठी सावली कुठेच नाही.
पूर्वी दुतर्फा झाडांनी वेढलेल्या या मार्गाने प्रवास करताना जणू बोगद्यातूनच प्रवास करत असल्याचा अनेक ठिकाणी अनुभव येत असे. यंदाच्या उन्हाळ्यात अनेक वाहनधारक वाहने थांबवून नैसर्गिक गारव्याचा आनंद घेत होते. बाहेरगावाच्या वाटसरूंसाठी हा विषय कुतूहलाचा असायचा. दुभाजकांमध्ये लावल्या जाणाऱ्या फुलांच्या झाडांबरोबर उन्हात सावली देणारी झाडेही रस्त्याच्या दुतर्फा लावली जावीत, अशी मागणी होत आहे.
झाडांखाली सोडली जायची शिदोरी
अनेक प्रवासी घरून घेतलेले जेवण रस्त्यालगतच्या एखाद्या झाडाखाली बसून सहपरिवार सेवन करीत असल्याचे दिसायचे. गायी, बैल आदी पशूही या झाडांखाली विश्रांती घेताना दिसायचे. मात्र आता पूर्ण चित्र पालटले आहे.