शेख जफरवर तडीपारीची टांगती तलवार
By admin | Published: February 13, 2017 12:05 AM2017-02-13T00:05:16+5:302017-02-13T00:05:16+5:30
शहराचे उपमहापौर व छायानगर-गवळीपुरा प्रभागातील काँग्रेसचे उमेदवार शेख जफर शेख जब्बारच्या तडीपारीचा प्रस्ताव कोतवाली पोलिसांनी तयार केला आहे.
तिसरा प्रस्ताव : १३०० गुन्हेगारांवर होणार प्रतिबंधक कारवाई
अमरावती : शहराचे उपमहापौर व छायानगर-गवळीपुरा प्रभागातील काँग्रेसचे उमेदवार शेख जफर शेख जब्बारच्या तडीपारीचा प्रस्ताव कोतवाली पोलिसांनी तयार केला आहे. तिसऱ्यांदा हाप्रस्ताव तयार झाला असून शेख जफरवर पुन्हा तडीपारीची टागंती तलवार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसांनी गुन्हेगारांची धरपकड मोहीम सुरु केली असून तब्बल १ हजार ३०० गुन्हेगारावर प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे. आतापर्यंत पोलिसांनी विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ६७९ गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई केली असून यातील कुख्यात गुन्हेगारांची पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्यासमोर पेशी केली आहे. यागुन्हेगारांना दम देण्यात आला असून निवडणुकीत गुन्हेगारी कृत्य होऊ नयेत, त्यादृष्टीने यागुन्हेगारांना ताकीद देऊन त्यांच्याकडून ‘बॉन्ड’लिहून घेण्यात आलेला आहे. शेख जफरचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्यामार्फत राजापेठ विभागाचे सहायक पोलीस आयुक्त यांच्याकडे पाठविण्यात आला असून त्यांच्याकडून एक नोटीस जारी करण्यात आली आहे.
शहर कोतवाली पोलिसांमार्फत ती नोटीस शेख जफरला देण्यात येणार आहे. यापूर्वीही शेख जफरला शहरातून दोन वेळा तडीपार करण्यात आले होते. मात्र, त्याने तडीपारीच्या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेऊन आदेशाला स्थगिती मिळविली होती. आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर पोलिसांनी शेख जफरचा तिसऱ्यांदा तडीपार प्रस्ताव तयार केला असून त्यांच्या राजकीय क्षेत्रावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. शेख जफर याला तडीपार केल्यास त्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
याशिवाय शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील २३ गुन्हेगारांना दोन वर्षांकरिता तडीपारीचा प्रस्ताव पोलीस विभागाने तयार केले असून पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)
गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या शेख जफरचा तडीपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे. यासंदर्भात शेख जफरला नोटीस बजावण्यात आली आहे.
- विजय पाटकर,
पोलीस निरीक्षक, कोतवाली ठाणे.