शहानूर नदीचे पात्र वळविणार
By admin | Published: June 21, 2015 12:33 AM2015-06-21T00:33:47+5:302015-06-21T00:33:47+5:30
मागील पाच वर्षांपासून तालुक्यातील सुकळी येथे भूस्खलन होत असल्याने अनेक घरांना तडे गेल्यामुळे
भूस्खलन : सुकळी येथे विभागीय आयुक्तांची पाहणी
संदीप मानकर दर्यापूर
मागील पाच वर्षांपासून तालुक्यातील सुकळी येथे भूस्खलन होत असल्याने अनेक घरांना तडे गेल्यामुळे शनिवारी विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी गावाची पाहणी करुन शहानूर नदीचे पात्र वळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
शनिवारी विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी सुकळी गावाला भेट देऊन भूस्खलनाची पाहणी केली. शहानूर नदी गावानजीक वाहत असल्यामुळे काळ्या मातीला तडे जाऊन मागील वर्षी पाच ते सात नागरिकांची घरे भूस्खलनाच्या तळाख्यात सापडले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी पाहणी केली होती.
शहानूर नदीचे पात्र गावापासून डायव्हर्ट केल्यास भविष्यातील भूस्खलनाचा धोका टळू शकतो, असा अंदाज भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. दरम्यान भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा उपसंचालक अजय कर्वे, वरिष्ठ भूवैज्ञानिक संजय कराळे, तहसीलदार राहुल तायडे, नायब तहसीलदार राजेश गुरव, शिवसेनेचे बाळासाहेब हिंगणीकर आदी उपस्थित होते.
लासूरच्या शेतकऱ्यांची पाहणी, आढावा
लासूर येथे जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत करण्यात आलेल्या गाव तलावाची विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी पाहणी केली व कामाचे कौतूक केले. आदर्श ग्राम रामागड येथील शेतकऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. त्यांच्या समवेत तालुका कृषी अधिकारी विनोद लंगोटे, विजय पाटील पवित्रकार व गावातील नागरिक उपस्थित होते.
सुकळीला भूस्खलनाचा धोका आहे. भूजल सर्वेक्षण अधिकारी यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली आहे. शहानूर नदीचे पात्र गावापासून डायव्हर्ट करण्याचा प्राथमिक सर्वेक्षण अंदाज आहे. तसा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन पाठविण्यात येईल.
- ज्ञानेश्वर राजूरकर,
विभागीय आयुक्त, अमरावती.