पुलाचे बांधकाम पूर्ण होइस्तोवर ‘शकुंतला’ बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 01:36 AM2019-05-03T01:36:06+5:302019-05-03T01:36:31+5:30
अचलपूर ते मूर्तिजापूर व पुढे यवतमाळपर्यंत धावणारी शकुंतला ही लेकुरवाळी रेल्वेगाडी पुलाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना आणखी काही दिवस स्वस्त प्रवासापासून वंचित राहावे लागणार आहे.
रेल्वे विभागाचा निर्णय : लाक डी रपटे बदलविण्याचे काम सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अचलपूर ते मूर्तिजापूर व पुढे यवतमाळपर्यंत धावणारी शकुंतला ही लेकुरवाळी रेल्वेगाडी पुलाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना आणखी काही दिवस स्वस्त प्रवासापासून वंचित राहावे लागणार आहे.
दर्यापूरनजीक गायवाडी रेल्वे फाटकाजवळ गत आठवड्यात शकुंतलेची चारचाकी वाहनाला जबर धडक बसली. यात वाहनातील सात प्रवाशांना गंभीर इजा पोहोचली होती. गायवाडी हे फाटक मानवविरहीत असल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. अचलपूर ते मूर्तिजापूर दरम्यान काही पुलांची स्थिती दयनीय आणि म्हणूनच अपघातासाठी पोषक आहे. त्यामुळे मध्य रेल्वे भुसावळ विभागाने पुलासह अन्य बांधकाम पूर्ण होईस्तोवर शकुंतला बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती बडनेरा रेल्वे स्थानकाचे मुख्य खंड वाणिज्य निरीक्षक शरद सयाम यांनी दिली. शकुंतला धावणाऱ्या १२ ठिकाणी अपघातप्रवण स्थळाची नोंद आहे. या ठिकाणी डागडुजी, दुरुस्तीची कामे पूर्णत्वास आल्यानंतरच शकुंतला सुरू होणार आहे. यासंदर्भात रेल्वेचे पुढील आदेश प्राप्त होतील, असे शरद सयाम यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.